शिक्षक म्हणजे समाजाचा खरा शिल्पकार
सामना समाजाचे शिल्पकार म्हणजेच शिक्षक स्वत: साठी कधीच जगत नाहीत तर समाजाचे उज्ज्वल भवितव्य ऊर्जावान बनविण्यासाठी जगतात. चांगले शिक्षण कोणालाही बदलू शकते, परंतु एक चांगला शिक्षक सर्वकाही बदलू शकतो. असे शिक्षक कधीही कामावरून रिक्त किंवा सेवानिवृत्त होत नसतात. ते आयुष्यभर ज्ञानाची ज्योती पेटलेली ठेवतात. आजच्या स्वार्थी आणि व्यापारीकरणाच्या युगात 'शिक्षक दिनी' अशा प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ, शिक्षणासाठी वाहून घेतलेल्या शिक्षकांना सन्मानित करायला हवे.
शिक्षकाला राष्ट्र निर्माणकर्ता म्हणतात. शिक्षकांची जबाबदारी ही आहे की, विद्याथ्यांना जगण्याच्या सर्व कलेत पारंगत होतील आणि समाजात सभ्य नागरिक म्हणून वावरतील. त्याद्वारे एक मजबूत समाज आणि राष्ट्र निर्माण करू शकतील. देशाचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ राधाकृष्णन व्यवसायाने शिक्षक होते आणि त्यांचा असा विश्वास होता की, बलवान राष्ट्र घडविण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका शिक्षक बजावतो. आपल्या देशात शिक्षण क्षेत्रात बरीच थोर व्यक्तिमत्वे होऊन गेली. त्यांनी आपले संपूर्ण जीवन लोकांच्या कल्याणासाठी, विकासासाठी वाहिले आणि देशाचे नाव जगभरात गाजवले.
सावित्रीबाई ज्योतिबा फुले देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका, बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आणि किसान शाळेच्या संस्थापक, समाजसुधारक आणि कवयित्री होत्या. प्रामुख्याने स्त्री शिक्षण क्षेत्राच्या प्रणेत्या असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना त्यावेळी तीव्र सामाजिक विरोधाचा सामना करावा लागला. प्रचंड विरोधानंतरही त्यांनी मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली, या महान कामात त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्याबरोबर होते. स्वामी विवेकानंद अतिशय प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व होते. हिंदू धर्म, हिंदू तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान तसेच योग पाश्चिमात्य जगाला देण्यास विवेकानंदांनी खूप महत्वाची भूमिका बजावली आहे. शिकागो येथे भरलेल्या जागतिक धार्मिक संसदेत त्यांनी आपली ऐतिहासिक व्याख्याने आणि प्रवचने सादर केली. ते तपस्वी होते. विवेकानंदांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी वाहिले. गरीब आणि पीडित लोकांकरीता त्यांनी काम केले. विवेकानंद यांचा वाढदिवस 12 जानेवारी रोजी देशात युवा दिन म्हणून साजरा केला जातो.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे देशाचे अकरावे राष्ट्रपती होते. त्यांचे आयुष्यदेखील प्रेरणादायी आहे. मिसाइल मॅन म्हणून त्यांना ओळखले जाते. ते एक लोकप्रिय राष्ट्रपती तर होतेच, पण सुप्रसिद्ध लेखक आणि उत्तम शिक्षकदेखील होते. विद्यार्थ्यांना ते नेहमी मार्गदर्शन करीत. सध्याच्या शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या युगातही काही आदर्श शिक्षक आहेतच. गणिताचे शिक्षक, सुपर 30 म्हणून कोचिंग क्लासद्वारे ओळखले जाणारे आनंद कुमार गरीब मुलांना विनामूल्य शिकवतात. सायकलिंगद्वारे शिक्षणाचा प्रचार - प्रसार करून विश्वविक्रम निर्माण करणारे आदित्य कुमार आयुष्यभर मुलांना विनामूल्य शिकवत आहेत. दिल्लीतील झोपडपट्ट्यांमधील निराधार मुलांना शिकवणारे राजेश कुमार शर्मा आहेत. अब्दुल मलिक हे दररोज मल्लापुरममधील नाला पार करून मुलांना वेळेत शिकवायला येत असत . अरविंद गुप्ता कागदाची सुंदर आणि सोपी कलाकृती बनवून मुलांना खेळात शिकवत असत. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये वर्तमानपत्रांची विक्री करणारे प्रो. संदीप देसाई महाराष्ट्र आणि राजस्थानच्या ग्रामीण भागातील असहाय मुलांच्या शिक्षणासाठी निधी गोळा करायचे. शिक्षण विभागातून निवृत्त झाल्यानंतर दिल्लीच्या विमला कौल 23 वर्षांपासून निराधार मुलांना शिकवित आहेत. पाटण्याचे मोतीहर रेहमान खान केवळ अकरा रुपये शुल्क घेवून आयएएस, आयपीएस, आयआरएस परीक्षेचे कोचिंग देतात. मेरठ येथील शासकीय प्राथमिक शाळेच्या शिक्षिका डॉ. कौसर जहां यांनी गरीब मुलांसाठी आपले जीवन समर्पित केले. संपूर्ण आयुष्य अविवाहित राहून गरीब मुलांना त्या शिकवतात. छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यात कोकडी प्राथमिक शाळेतील शिक्षक गेंदालाल कोकडिया आणि त्यांची पत्नी गावातील गरीब मुलांना मदत करण्यासाठी पगाराच्या 90 टक्के खर्च करतात. या शिक्षकांच्या निःस्वार्थ सेवाकार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील दखल घेतली गेली आहे. त्यांच्यासारखे बरेच लोक आहेत जे गरजू मुलांना विनामूल्य शिकवतात. जे खरे शिक्षक बनून निराधार मुलांचे भविष्य सुधारतात आणि एक सशक्त हिंदुस्थान घडवतात. कोणत्याही परिस्थितीत शिक्षकाची भूमिका ही सत्वशील आणि मजबूत सुशिक्षित समाज निर्माण करणे हीच असायला हवी. संपूर्ण देश अशा शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त नेहमीच अभिवादन करीत असतो.
आपली जबाबदारी समजून घ्या : दरवर्षी लाखो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात. वास्तविक सर्वात जास्त शैक्षणिक संस्था असणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आपला आहे. देशाच्या प्रत्येक गल्लीत कोचिंग क्लासेसचे पीक सतत येत असते. मात्र त्याचवेळी दुसरीकडे वर्षानुवर्षे अनेक राज्यांतील शिक्षण विभागात भरती नाही. आपल्या देशातील बायाच राज्यांत सरकारी शाळांची नेमकी स्थिती काय आहे हे सर्वांना माहिती आहे. आज बहुतेक लोक आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये शिकवतात, महागडे कोचिंग क्लासेस लावून देतात. खरे म्हणजे खासगी शैक्षणिक संस्था दर्जेदार शिक्षण देत असतील तर सरकारी संस्था मागे का आहेत, हा प्रश्न समाजाने विचारायला हवा. सर्व राज्यांच्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, आश्रमशाळा व इतर सरकारी शाळा या केंद्रीय विद्यालये आणि नवोदय विद्यालयांसारख्या विकसित केल्या पाहिजेत आणि गुणवत्तेप्रमाणे दरवर्षी तेथे भरती करायला हवी. ग्रामीण आणि मागास भागातील शिक्षणाची परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. शिक्षणाचे दोन वेगवेगळे भाग उदयास आले आहेत, ते म्हणजे गरीब मुलांसाठी सरकारी शाळा आणि श्रीमंत मुलांसाठी खासगी शाळा. मोठ्या शहरांमध्ये सरकारी शाळा आपल्या अस्तित्वासाठी लढा देत आहेत. महानगरपालिकेच्या बहुतेक शाळा बंद पडल्या आहेत . श्रीमंत आणि गरीब सर्वांना समान दर्जाचे शिक्षण असले पाहिजे. शाळा सरकारी किंवा खासगी असो, पण एक देश, एक शिक्षण, एक गुणवत्ता असायला हवी. आजच्या कोरोना महामारीमध्येही देशातील कोणताही विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहू नये, हीच सर्वांना समान शिक्षणाची संधी आहे. शिक्षक असावे असे सद्गुणी : गुरूला आपल्या येथे देवाचे स्थान दिले गेले आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात कलंकित घटना कधीही घडू नयेत. मात्र त्या का घडत आहेत ? आजचा शिक्षक आपल्या पदाशी व कार्याशी शंभर टक्के न्याय करतो का ? असे अनेक प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरे नकारात्मक आहेत. शिक्षण क्षेत्राला आज आत्मचिंतनाची गरज आहे.
समाजाचे शिल्पकार म्हणजेच शिक्षक स्वत : साठी कधीच जगत नाहीत तर समाजाचे उज्ज्वल भवितव्य ऊर्जावान बनविण्यासाठी जगतात. शिक्षक हे मार्गदर्शक, दूरदर्शी, संशोधक, विश्लेषक, विषय तज्ज्ञ, मृदुभाषी, शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ, समर्पित आणि मेहनती असावेत. शिक्षकाचे वर्तन विद्याथ्यांसमोर आदर्शवद असले पाहिजे. शिक्षक निंदनीय वागणूक, लोभ, अभिमान, देखावा, नशा आणि भ्रष्टाचारापासून दूर असावेत. चांगले शिक्षण कोणालाही बदलू शकते, परंतु एक चांगला शिक्षक सर्वकाही बदलू शकतो. असे शिक्षक कधीही कामावरून रिक्त किंवा सेवानिवृत्त होत नसतात. ते आयुष्यभर ज्ञानाची ज्योती पेटलेली ठेवतात. आजच्या स्वार्थी आणि व्यापारीकरणाच्या युगात 'शिक्षक दिनी' अशा प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ, शिक्षणासाठी वाहून घेतलेल्या शिक्षकांना सन्मानित करायला हवे.
संदर्भ : डॉ. प्रीतम गेडाम samana.com
Comments
Post a Comment