सिंहावलोकन


सिंहावलोकन हा शब्द दोन शब्दांना जोडून तयार होतो. एक म्हणजे सिंह आणि दुसरा म्हणजे अवलोकन. अवलोकन करणे म्हणजे पाठीमागे झालेल्या गोष्टींचा पाठपुरावा करणे व झालेल्या गोष्टींकडे मागे वळून पाहणे.

सिंहावलोकन म्हणजे सिंहाप्रमाणे मागे पाहून मागच्या कारकीर्दीवर नजर टाकणे.

आपल्या आयुष्यात आपण सुद्धा एका निरंतर वाहणाऱ्या नदी सारखे वाहतो. अडथळे येतात, संकटे येतात कधी आपणच अडचणींचे लक्ष ठरतो. पण आयुष्यात पुढे चालायचे असेल तर हे सिंहावलोकन करता आले पाहिजे. ते करताना बरेचदा न पाहलेल्या, न जाणवलेल्या किंवा न समजलेल्या गोष्टी, त्यांची खोली किंवा त्याचा न कळलेला अर्थ नव्याने समजू लागतो. आपल्याला जाणवणाऱ्या मागच्या प्रवासातील गोष्टी कधी गर्द आणि अनाकलनीय वाटू लागतात, वेळेनुसार एका अशांत सागरा समान गलबल उठवतात, अस्थिर झालेल्या मनाला निराशा आणि नकारात्मक दिशेला घेऊन जातात पण खरं सांगायचं तर हीच ती वेळ असते स्वतःला स्वतःची सोबत करण्याची. आपण रोज आरशात पाहतो, सजतो आणि सजवतो पण तेव्हा बाह्य रंगोटी मधून जेवढा आनंद मिळत नाही जेवढा हा सिंहावलोकन करताना मिळतो. आपल्यातले एक एक कंगोरे आणि स्वतःला शोधण्याचा निखळ आनंद हा या वाटेवर मिळू शकतो जर त्याकडे स्वतःला समजून घेण्याच्या 'अँगल'ने पाहता आले.

ह्या जगात चूक किंवा बरोबर असे काय नसते, आपण आपले विचार, भावना व कृतींकडे डोळस पणे पाहत नाही म्हणून कृती घडतात  आणि त्यावर आपण वर्तनाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देतो ज्याला आपण चुका घडणे म्हणतो. जसं आयुष्य समोर येतं तसं आपण जगतो कधी कधी त्याला आपण अधिक सुसह्य करण्यासाठी अनेक रंगबेरंगी वेष्टन चढवतो, सुपिरिअरिटी कडे जाता जाता वास्तव विसरून जातो, चालता चालता खूप पुढे जातो आणि मग जेव्हा थबकतो तेव्हा मागचा प्रवास अनेकदा आपल्याला आपल्यातील खोट काढणारा वाटतो, आपण किती विचित्र आणि उथळ होतो याची जाणीव करून देतो. पण हे ही सगळे जण करतात असे नाही कारण ही जाणीव होणे सुद्धा फार महत्वाचे असते. त्यामुळे जेवढं आरसा दाखवतो तेवढं  प्रतिबिंब म्हणून पाहण्यात मजा नाही, स्वतःला शोधण्यासाठी 'सेल्फ डिस्कव्हरी' ची बॅग पॅक करून बिनधास्त जगता आले पाहिजे. ही जाणीव आणि हा प्रवास फार अनोखा असतो. जर त्यातील नकारात्मकतेची जबाबदारी घेऊन सकारात्मकता शोधण्याचे बळ सोबत घेतले तर.

ह्या जगात 'स्व' सारखा शक्तिशाली सोबती दुसरा नाही, इथे सगळे आपण प्रवासी आहोत, जेव्हा आपल्यासोबत कोण नसणार आहे तेव्हा 'मीच माझा सांगाती' म्हणून जिद्दीने चालत राहायला हवे, स्वतःमधील काळी बाजू दिसली म्हणून बिथरून चालणार नाही. भूतकाळ हा माणसाला कधीच सरळ करता येत नाही पण आयुष्याच्या सारीपाटावर उधळलेला खेळ नक्की नव्याने आणि शिताफीने खेळता येतो त्यासाठी धैर्याने 'सिंहावलोकन' प्रत्येकाने केले पाहिजे.

 इथे आपण आणि आपलेपणाचा प्रवास असतो पण त्याला सकारात्मक 'स्व' संवाद आणि घडून गेलेली चूक भूल जर 'क्षमाशिलतेच्या' मार्गाने हाताळली तर पुढचा प्रगल्भ आणि मानसिक परिपक्वतेच्या प्रवासाचा राजमार्ग सुरू होतो. त्यामुळे आयुष्यात 'हिअर आणि नाऊ' मध्ये जगणे आणि पुढे जाता जाता सिंहावलोकन करणे हे फार जालीम उपाय ठरते.


अमृता जोशी.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

परीक्षेची अवास्तव भीती (एक्झाम फोबिया)

स्त्रियांची एनर्जी