सूत्रसंचालन एक करिअर

मित्रहो, 

सूत्रसंचालन हा विषय व्यापक आहे. ही कला आहे. तिला शास्त्रोक्त आधार आहे. हे लक्षात घेतलं तर सूत्रसंचालन हा व्यवसायही ठरू शकतो. ते करिअरही बनू शकते. यशस्वी सूत्रसंचालनकर्त्याला व्यवसायाची विविध दालन खुली झाली आहेत . हे दालनं, हे मार्ग कोणते ते आपण बघूया. यामध्ये मूळ सूत्रसंचालक - निवेदक हे जाहीर कार्यक्रमासाठीची भुमिका वठवणे हा व्यवसायच आहे . यात शंका नाही. हल्ली सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मोठ्या प्रमाणावर आहे. तेव्हा हेच करिअर केले तरी चालू शकते. पुरेसे मानधन यामधुन मिळवू शकता. छंद म्हणून सुत्रसंचालन करायचे असेल तर ठीक आहे ; पण हे उत्तम करिअर आहे हे ध्यानात ठेवा ! व्यावसायिक निवेदक म्हणून पैसा कमाविता येतो.

वाद्यवृंद किंवा काव्य मैफल: 

   विविध काव्य मैफलींना निवेदकाची गरज नित्य भासते, अशावेळी कवी नसलेला निवेदक असला तर तो चौफेर निवेदन करू शकतो. गाजलेल्या काव्यपंक्ती पेरू शकतो, हा एक प्रकार किंवा मग ऑर्केस्ट्रा, गीत मैफलींचे संच - ग्रुप यामधून निवेदन करणे हा करिअरचा भाग ठरू शकतो. मोठ्या शहरामधून अर्धवेळ - पूर्णवेळ चालवले जाणारे वाद्यवृंद आहेत. मात्र ऑर्केस्ट्रामधील निवेदक हा नकलाकार पाहिजे असा अट्टाहास ऑर्केस्ट्रा संचालक करतात, तेव्हा मिमिक्री, नकला, विनोद यांचा आधार घेता आला तर या व्यवसायासाठी पूरक ठरू शकेल. मराठीतही चांगले मंच आहेत, तयार होत आहेत. त्यांच्या निवेदनाला एक वेगळा साहित्यिक दर्जा लागतो. हा प्रयत्न झाला तर हे नवे दालन ठरेल. मुलाखतकार हा व्यवसायाचाच भाग आहे. प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांच्या रंगमंचावरून प्रकट मुलाखती घेता येतील. त्यादृष्टीने 'मुलाखतीचे तंत्र' अभ्यासा आणि टीव्हीवरील मुलाखतींचे कार्यक्रम बघत चला.

आकाशवाणी - टीव्हीसाठी:

याशिवाय सद्य:स्थितीत आकाशवाणी, एफएम रेडिओसारखे श्रवण माध्यम उपलब्ध आहे. त्यातही खाजगी एफएममुळे निवेदकाला संधी मोठी आहे. मात्र दोनहीं प्रकारात तोंडी, लेखी परीक्षा ; तसेच ऑडिशन्स यांना सामोरं जावं लागतं. अशा परीक्षामधुन ' ऑब्जेक्टिव्ह ' स्वरूपातील सामान्यज्ञानावर आधारित प्रश्न असतात, भाषांतरे करावी लागतात. मग मौखिक परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागते. सोबतच ऑडिशनमध्ये उत्तीर्ण होणे महत्त्वाचे. त्यानंतर प्रशिक्षण कालावधी असतो, एकदा या पायऱ्या पार पाडल्या तर हे करिअर दीर्घकाळाची निश्चिती देणारे आणि व्यवस्थित उत्पन्न देणारे आहे. आता टीव्ही चॅनल्सचे अमाप पीक आले आहे. विविध वाहिन्यांवर अंकर, वृत्तनिवेदक, मुलाखतकार, विश्लेषक, चर्चासत्र सादरकर्ता असे कार्यस्वरूप राहते. यामध्ये बाह्य व्यक्तिमत्त्वाचा भागही थोडा अवलंबून असतो. त्यादृष्टीने तयारी केली तर हे क्षेत्र खूपच व्यापक आणि कायमस्वरूपी संधी निर्माण करणारे क्षेत्र आहे. मात्र रेडिओ - टीव्ही दोन्हीसाठी पदवीधर असणे गरजेचे आहे. शिवाय प्रारंभीची ऑडिशन पास होणे महत्त्वाचे.

वृत्तपट- डबिंग: 

याशिवाय ऑडिओ कॅसेटचे निवेदन, शैक्षणिक सीडीजचे निवेदन, माहितीपट, उद्बोधनपटांसाठी आवाज (पार्श्वनिवेदन - व्हॉईस ओव्हर) देता येईल, रेडिओवरील जाहिरातींसाठीचे ध्वनिमुद्रण करता येईल. ऑडिओ डबिंग हा तर करिअरचा मोठा पैलू ठरू शकतो. डबिंग आर्टिस्ट हे मानाचं आणि भरपूर काम - पैसा देणारं माध्यम आहे. शिस्तबद्ध पद्धतीने रियाज झाला, तर वरीलपैकी कोणतेही क्षेत्र तुम्ही काबीज करू शकता. आत्मविश्वासाने वाटचाल आणि प्रामाणिक मेहनत करा, संधी येणारच !

एकपात्री टॉक शो: 

सूत्रसंचालनात करिअरविषयी आपण बघितलंच आहे. यात आणखी एक नवीन दालन म्हणजे एकपात्री प्रयोग ! अर्थात, एकपात्री अभिनय नाही तर एकपात्री टॉक शो ! इथे अभिनयापेक्षा संवाद महत्त्वाचा, संवादशास्त्र महत्त्वाचं...  आवाजातील चढ उतार, संवाद रंगवण्याची हातोटी, विषय खुलवण्याची पद्धत महत्त्वाची. याचं उत्तम उदाहरण आजच्या घडीला द्यायचं आल्यास शरद उपाध्ये यांचं राशिचक्र बारा राशींची माहिती सांगताना ती मनोरंजक स्वरूपात सादर करून एक वेगळा प्रयोग उपाध्ये यांनी केला. राशींची माहिती, राशींचे गुण - अवगुण वैशिष्ट्ये हे हलक्या- फुलक्या पद्धतीने, रिझवणाऱ्या पद्धतीने सांगण्याचा पहिला प्रयोग त्यांनी केला आणि तो प्रमाणाबाहेर यशस्वी झाला. त्यापूर्वीही असे प्रयोग कुणी केले नाही असं नाही, मात्र राशी रंजक स्वरूपात मांडता येतात हे प्रथम त्यांनीच दाखवून दिलं. कोणत्याही विषयात रंजकता आणता येते हेच यातून सिद्ध होतं. 

      मराठीत पहिला यशस्वी अफलातून प्रयोग केला तो पु. ल. देशपांडे यांनी. त्यांच्या कथाकथनाने जगभरातील मराठी माणसाला भुरळ घातली. पु. लं. चा हा प्रयोग एकपात्री अभिनय नव्हता, तर ते संवादावरचं प्रभुत्व होतं. संवाद -कलेचा मापदंड होता. केवळ आवाजावरच्या हुकमतीतून साधलेला तो अत्युच्च कलाविष्कार ठरला. निव्वळ कथाकथनात ज्यानी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं त्यामध्ये व. पु. काळे यांच नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. शंकर पाटील, द. मा. मिरासदार यांची नावेही टाळता येणार नाहीत. ही काही उदाहरणे, मात्र हे सर्व मुळात स्वत: साहित्यिक आहेत हे महत्त्वाचं. त्यांनी त्यांचेच साहित्य सादर केले. मात्र दुस-या साहित्यिकांचे लेखन - साहित्य - कविता सादर करणारेही दिग्गज आहेत. यामध्ये प्रा. विसुभाऊ बापट यांचा एक कार्यक्रम 'कुटुंब रंगलंय काव्यात हा स्मरणशक्ती आणि सादरीकरण शैलीचा उत्तम नमुना ठरू शकतो. हजारो कविता मुखोद्भूत करूनही कार्यक्रम सादर होतो ही कमाल आहे. निवेदनाची अफलातून शैली, रंगवणारे किस्से, यांची सांगड घालून विषय खुलवणारे कलाकार म्हणता येतील असे, स्वत:चा एकपात्री टॉक शो मादर करणारे शिरीष कणेकर, द्वारकानाथ संझगिरी, सुहास चांदेकर आदींनीही ठसा उमटवलाच आहे. एकपात्री टॉक शो करण्यासाठी तुम्ही साहित्यिक असणं गरजेचं नाही. मात्र तुमचं सादरीकरण ठरावीक विषय घेऊन तो खुलवण्याची - फुलवण्याची हातोटी पाहिजे. मार्गसुद्धा करिअरचा शकतो, व्यवसायाचा असू शकतो हे लक्षात ठेवून त्यावरही तुम्ही विचार करू शकता हे ध्यानात ठेवा !


(सारंग टाकळकर यांच्या उत्कृष्ट सूत्रसंचालन या पुस्तकातून साभार)

Comments

Popular posts from this blog

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

परीक्षेची अवास्तव भीती (एक्झाम फोबिया)

स्त्रियांची एनर्जी