तरुणपिढी....फक्त ऑनलाईन

        पूर्वी पाटावर बसवून लहान बाळांना मऊ वरण भात हाताने भरवताना,  आई  चिऊ काऊ दाखवत , त्यांच्या गोष्टी सांगत असे. आता आईच्या हाताची जागा चमच्याने घेतली, पाटाची जागा खुर्चीने घेतली आणि चिऊ काऊंची जागा मोबाईलने घेतली! अगदी तीन चार महिन्याच्या बाळांना सुद्धा मोबाईल दिला जातो आणि वर कौतुकाने सांगतात की मोबाईल बघतच तो खातो. वर्षाच्या आत त्या बाळाला मोबाईलची इतकी सवय होते की आईला कळणार नाहीत इतक्या गोष्टी त्या मोबाईलमधून बाळ करू लागत. थोडं मोठं झाल्यावर, त्यातले सगळे फीचर्स त्याला हळूहळू समजू लागतात. इतक्या लहान वयापासून मोबाईलवरील गेम्सने त्या बाळाला अगदी चटकच लागून राहते. चार बाय दोनच्या जादुई डबड्याला ते आकर्षित होत असत.पण त्याच्या डोळ्यांवर, शरीरावर होणारा वाईट परिणाम घरातील कुणाला दिसत नाही. त्याचे मैदानी खेळ खेळण, मुक्त हालचाली करणं बंद होत. जणू एक व्यसन त्याला लागलेलं असत. हे प्रत्येक घरातील  उदाहरण आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

    आधीच लगत असलेल्या मोबाईलच्या व्यसनात.....  आता अधिकृतपणे भर पडलीये....सगळं ऑनलाईन!  कोविड मुळे ज्या त्या गोष्टींवर ऑनलाईन असा अधिकृत शिक्कामोर्तब झालाय. शाळा, कॉलेज, क्लास, डान्स क्लास, योग वर्ग, मीटिंग, काही शिबिरे सगळच  ऑनलाईन गरजेचेच झालंय. आत्ताच्या परिस्थितीत मुलांच्या आणि सर्वांचाच आरोग्याचा विचार करता हे योग्यही आहेच! 

    पण ही मुलं ऑनलाईन किती अभ्यास करतात? त्यांना ते कळत का? त्यांचं किती लक्ष असत? आणि बर...अस समजून चालू की वर्ष दीड वर्षात ह्या मुलांना ऑनलाईन शाळा, कॉलेज मधून शिकवलेलं थोडं फार कळल असेलही. पण बाकीच्या वेळी ही मुलं कित्येक तास ऑनलाईन असतात. अभ्यासाच्या नावाखाली मूलं काय करतात? हे पालकांच्या लक्षात येत का? प्रत्येक मूलं असच करत असेल असंही नाही. पण आज घरोघरी हेच वातावरण आहे. 

      आता अनेक नवनवीन ऍप्स निघालेत, मुलं सर्रास ते डाउनलोड करतात. ते त्यावर काय करतात, खेळतात का, की अभ्यास करतात, का काही माहिती घेतात की काही चित्र बघतात?, व्हिडीओ बघतात?  आणि ते जर नको ते काही बघत असतील तर....?  दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत ही  आपली मुलं काय करतात? हे   आई वडिलांना कुठे काय कळत? शाळा आणि कॉलेज मधील  मुलांच्या दैनंदिनीत बदल झालाय, उशिरा उठायचं,  कॊविड म्हणून बाहेर जायचं नाही, त्यामुळे दिवसभर ऑनलाईन! खाण्या पिण्याचंही भान नसत ह्या मुलांना. सलग दोन वर्षे परीक्षा  नाहीत, पुढील वर्गात आपण जाणारच , आपल्याला पास करतात असे  अनेक ग्रह मुलांनी केलेले असतात. शाळा,कॉलेज, अभ्यास याची गंभीरताच नाहींअहि झालीय.  हातात मोबाइल घेऊन, आळसाने सुस्त होऊन लोळत पडून  राहणे इतकंच तरुण पिढीच विश्व झालंय. 

       काही अपवाद असतात याला, दुसरी बाजू म्हणजे खरोखरच ज्यांना अभ्यासाची आवड आहे, शिक्षणात रस आहे,  जे उच्च शिक्षण घेत आहेत, त्यांना विचार करून करून खूप त्रास होतोय की काय झालं आपल्या करिअरच? एम. बी. बी. एस ,  रिसर्च, इंजिनियरिंग, शास्त्रज्ञ , फूड टेकनोलॉजि, अनेक क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांचं  खूप नुकसान होतंय.सगळ्याच गोष्टी ऑनलाईन शक्य नसतात. जिथे प्रॅक्टिकलच नाही तिथे ही मुलं पुढे काय करणार? शिक्षणाचं भविष्य काय? किती दिवस हे असच चालणार?अनेक प्रश्न आणि चिंता ह्या मुलांनाही भेडसावत आहेत. कित्येक तरुण मूल निराशेच्या गर्तेत जात आहेत. पण काय करणार? थांबलय सगळं,थांबावं लागलंय कोविडमुळे... नाईलाज आणि तितकीच गरजही आहे ही!

    पण आज ,उद्या काही दिवसांनी, महिन्यांनी कोविडचा जरी सर्वनाश झाला ,तरी परिस्थितीनुसार  कदाचित काही आवश्यक ऑनलाईन गोष्टी पुढेही सुरू राहू शकतात. पण आवश्यक म्हणता म्हणता, अनावश्यक ऑनलाईन  मध्ये आपण स्वतःला किती गुरफटून घ्यायचं हे तरुण पिढीने स्वतः ठरवले पाहिजे. सवय झालेली असते सतत मोबाईलची. मोबाईलशिवाय सतत अस्वस्थ वाटत राहतं...कशी घालवायची ही सवय?  पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे,ते काय करतात याची माहिती त्यांना असंण खूप गरजेचं आहे. मैत्रभाव ठेऊन, विश्वासात घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर गप्पा मारल्या पाहिजेत.  त्यांना वेळ दिला पाहिजे.  आजच्या घडीला कुटुंबाने त्यांचं मानसिक स्वास्थ्य सांभाळल पाहिजे. म्हणजे ह्या मुलांचं चित्त विचलित होणार नाही.  आजची तरुण पिढी ही देशाचं उद्याच भविष्य आहे. ती सुदृढच हवी! शरीराने व मनानेही!

       सगळं लवकरच पूर्ववत, सुरळीत व्हावं आणि  होईलही... ह्या एका आशेवर सर्वांचे श्वास सुरू आहेत. आणि सर्वजण सरकारचे आदेश पाळत आहेत. पण  सगळं काळावर अवलंबून आहे...काळच  घेऊन येईल या सर्वांसाठी उत्तर! कधी,केव्हा, कस...हे तोच ठरवेल...पण  आपण मनाची उभारी कायम ठेऊया! 




©® सौ अश्विनी कुलकर्णी

सांगली

(लेखिका या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, कन्या महाविद्यालय, मिरज अभ्यासकेंद्राच्या मानसशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनी आहेत)

Comments

Popular posts from this blog

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

परीक्षेची अवास्तव भीती (एक्झाम फोबिया)

स्त्रियांची एनर्जी