यशाची गुरुकिल्ली
सोनू, चिनू आणि राजू तीन मित्र एकाच शाळेत शिकत असतात. तिघंही खूप हुशार असतात. ते तिघं यावर्षी वार्षिक परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा निश्चय करतात आणि त्यानुसार अभ्यासाला लागतात. सोनूने आपल्या वर्षभराच्या अभ्यासाचं वेळापत्रक बनवलेलं असतं आणि ते परीक्षा होईपर्यंत कटाक्षाने पाळतो. रात्रीची थोडीशी झोप आणि शाळेची वेळ सोडल्यास त्याचा सर्व वेळ हा विविध विषयाचा अभ्यास करण्यात जाई. खेळणं, टीव्ही पाहाणं, नातेवाईकांना भेटणं हे सर्व त्यांनी त्यावर्षासाठी बंद केलेलं असतं. जेवताना देखील तो अभ्यासाचं पुस्तक वाचत असे.
चिनूने देखील वर्षभर आपण अभ्यास कसा करायचा हे निश्चित केलं होतं. मन आणि शरीर निरोगी राहाण्यासाठी त्यांनी एका योग शिक्षकाकडून काही योगासनं शिकून घेतली होती. पहाटे लवकर उठून तो योगासनं आणि व्यायाम करायचा. तो अंघोळ, नाश्ता उरकून शाळेची वेळ होईपर्यंत अभ्यास करायचा. संध्याकाळी बाहेर फिरायला गेल्यावर अभ्यासाशिवाय इतर विषयांवर मित्रांशी गप्पा मारत असे. कुठेही न रेंगाळता घरी परत येई. त्याशिवाय एखाद्या रविवारी चांगला चित्रपट देखील पाहात असे. त्याच्यासाठी अभ्यास हा एक स्वस्थ मनाने वर्षभर करण्याचा नित्यक्रम होता.
राजूला आपल्या हुशारी वर गर्व असतो. त्यांने परीक्षेच्या आधी दोन महिने सर्व अभ्यासाचा फडशा पडायचा ठरवलं होतं. म्हणून त्यांने अभ्यासाचं कसलही नियोजन केलं नव्हतं आणि परीक्षेला दोन महिने असताना त्याने अभ्यासाला सुरुवात केली. मग त्याला कळून आलं की, रात्र थोडी आणि सोंगे फार अशी आपली अवस्था झाली आहे. अभ्यासाचे विषय बरेच होते आणि हातात दिवस मात्र कमी होते. त्यामुळे तो चिडचिड करू लागला. पण त्याचा अभ्यास वेळेत पूर्ण होत नाही.
परीक्षा अगदी तोंडावर आली आणि वर्षभराच्या कार्यमग्न आणि तणावग्रस्त दिनचर्येमुळे सोनूला अपचनाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे तो निराश झाला. पण त्याला आई वडिलांनी समजून घेऊन त्याला प्रोत्साहित केलं आणि त्यांने परीक्षा दिली. चिनू मात्र शांत आणि निश्चिंत होता. त्याचं शरीर आणि मन परीक्षेसाठी तयार होतं. मात्र राजूने देवाला नवस करून शेवटचे काही दिवस जसं जमेल तसं अभ्यास करून परीक्षा दिली. तिघंही परीक्षेत उत्तीर्ण झाले. चिनूला लक्षणीय यश मिळालं आणि भावेश आणि राजू मात्र जेमतेम गुण मिळवून उत्तीर्ण झाले.
तात्पर्य : तणावग्रस्त किंवा बेफिकरीपेक्षा नियोजनबद्ध अभ्यासानेच चांगले यश प्राप्त करता येते.
- मोहन गद्रे, कांदिवली
Comments
Post a Comment