परीक्षेची अवास्तव भीती (एक्झाम फोबिया)
पोट बिघडते, झोप उडते, अभ्यासात लक्ष लागत नाही आणि प्रत्यक्ष परीक्षा देताना हातात प्रश्नपत्रिका आली, की एकदम बधिर व्हायला होते. एकही प्रश्न ओळखीचा वाटत नाही, बघता बघता प्रश्नपत्रिकेवरची अक्षरे ‘गायब’ होऊ लागतात! मुले एकदम ‘ब्लँक’ होतात. यालाच एक्झाम फोबिया (exam phobia) किंवा ‘परीक्षेची अवास्तव भीती’ म्हणतात.
परीक्षेच्या भीतीची मेंदूतील केंद्रे :
मेंदूतील चार मुख्य केंद्रांमधून हे कार्य घडते.
हायपोथॅलॅमस : मेंदूच्या मध्यभागातील हे केंद्र भावना समजून त्यांच्या योग्य त्या संवेदना मेंदूला आणि त्याचवेळेस अंतःस्राव निर्माण करणाऱ्या ग्रंथींना पोचवते!
ॲमिग्डेला : हेही मेंदूच्या मध्यभागातील केंद्र भावनिक मेंदू व तार्किक मेंदूच्या मधल्या सेतूचे काम करते. पण हे केंद्र जास्त उत्तेजित झाले, तर तार्किक विचारशक्ती बंद पडते.
हिप्पोकॅम्पस : पहिल्या दोन्ही केंद्रांच्या अगदी जवळ असलेले हे केंद्र आपल्या स्मरणशक्तीच्या भांडाराचे दार आहे. (अर्थातच ते परीक्षेच्या वेळेत कायम उघडे असले पाहिजे.)
प्री-फ्रॉन्टल कॉर्टेक्स : आपल्या कपाळाच्या मागे, मेंदूच्या पुढील भागातील या केंद्रात आकलन, स्मरणशक्ती, भावनानिमंत्रण, तार्किक विचार व त्यांची मांडणी याची एकत्रित प्रक्रिया केली जाते.
कोल्ड कॉग्निशन (cold cognition)
घरी मुले जेव्हा निवांत वातावरणात अंथरुणात लोळत, गाणी ऐकत अभ्यास करत असतात, तेव्हा हायपोथॅलॅमस व ॲमिग्डेला शांत असते व अभ्यास सहज होतो. यालाच ‘कोल्ड कॉग्निशन’ म्हणतात.
ॲमिगडाला हायजॅक (amygdala hyjack)
परीक्षेच्या ताणामुळे हायपोथॅलॅमस उत्तेजित होते. त्यातून नॉरएपिनेफ्रिन व स्टेरॉइड्स रक्तात सोडली जातात. (ज्यामुळे छातीत धडधडते, हातपाय गार पडतात), त्याचवेळेस हिप्पोकॅम्पसवर उत्तेजकांचा हल्ला होतो, त्यातून स्मरणशक्तीचे दरवाजे बंद होतात. या आणीबाणीच्या परिस्थितीत ॲमिग्डेला मेंदूचे नियंत्रण स्वतःकडे घेते, विचार करणाऱ्या मेंदूशी संपर्क तुटतो. त्यातून प्रचंड ताण वाढतो, काही सुचेनासे घेते आणि मेंदू पूर्ण ब्लँक होतो.
हॉट कॉग्निशन (Hot cognition)
काही मुले मात्र या तणावांखालीही स्वतःला शांत ठेवतात. हिप्पोकॅम्पसचे स्मरणशक्तीचे दार उघडे ठेवतात. ॲमिग्डेलासुद्धा धाकात राहते. आपल्याला तणावाखाली जास्ती चांगले काम करायचे आहे, हा संदेश प्रिफ्रॉंटल कॉर्टेक्सला पोचतो (Positive Stress). तीच परीक्षा सोपी जाते.
अवास्तव परीक्षेची भीती कमी कशी करता येईल !
ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेची खरोखर भीती वाटत नाही, अशा विद्यार्थ्यांमध्ये काही गुण प्रकर्षाने दिसतात. ते म्हणजे वेळेचे व्यवस्थापन, अभ्यासाचे नियोजन व सकारात्मक दृष्टिकोन या बाबी सर्वात महत्त्वाच्या असतात. या तिन्ही बाबी जन्मजात नसतात; परंतु प्रयत्न केल्यास त्या सहज आत्मसात करता येतात. त्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांच्या प्रयत्नांची गरज असते. माझ्या मते, सुरुवातीला प्रत्येक परीक्षार्थीने स्वत:ला प्रामाणिकपणे खालील प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे.
- ही परीक्षा माझ्यासाठी महत्वाची आहे का? (केवळ आई-वडील, शिक्षक म्हणतात म्हणून अभ्यास करायला किंवा परीक्षेला बसण्यात अर्थ नाही. तुम्हाला स्वतःला परीक्षेचे महत्व समजायला हवे.)
- परीक्षा मला महत्वाची वाटत असेल तर अभ्यासासाठी मेहनत घ्यायची माझी तयारी आहे का? मी स्वतःकडून माझा झालेला अभ्यास आणि बुद्धिमत्तानुसार काय रास्त अपेक्षा ठेवू शकतो?
अभ्यासाच्या नियोजनात चार महत्त्वाच्या भागांकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. वाचन, चिंतन/मनन, सराव व तज्ज्ञ-शिक्षकांचे मार्गदर्शन हे ते चार महत्त्वाचे भाग आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे भूतकाळातील अपयशाचा विचार न करता फक्त येणा-या परीक्षेचा विचार करणे, आपला स्वत:वर व स्वप्रयत्नांवर दृढविश्वास असणे. तसेच यदाकदाचित अपयश आल्यास त्याला खंबीरपणे सामोरे जाण्याची मानसिक तयारी ठेवणेही गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागण्यासाठी काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे. त्या म्हणजे आपल्याबरोबरच्या विद्यार्थ्यांशी तुलना, स्वत:च्या प्रयत्नांकडे लक्ष न देता देवादिकांच्या आशीर्वादासाठी अवाजवी धडपड व आपल्या सध्याच्या समस्यांबद्दल इतरांना दोष देण्याची मानसिकता इत्यादी होय. परीक्षेच्या तयारीत पालक आणि शिक्षकांचा वास्तववादी व सम्यक सहभाग अत्यंत गरजेचा आहे. तथापि, काही गोष्टी त्यांनीही कटाक्षाने केल्या पाहिजेत. उदा. पाल्याच्या स्ट्रॉँग पॉइंट्सवर लक्ष केंद्रित करून त्याला प्रोत्साहन देणे. तसेच परीक्षा परीक्षार्थींच्या उन्नतीसाठी आहे; इतरांशी स्पर्धा करण्यासाठी नव्हे, ही जाणीव असावी. प्रयत्न करूनही पाल्याला अपयश आल्यास त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची तयारी आणि जेव्हा गरज असेल तेव्हा एक ‘जादू की झप्पी’ देण्यासाठी पुढाकार घेणेही आवश्यक आहे. शिवाय काही बाबी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. उदा. इतर मुलांशी तुलना, पाल्याला त्याच्या भूतकालीन अपयशाची आठवण करून देणे, पाल्याकडून अवाजवी व अवास्तव अपेक्षा बाळगणे पालकांनी टाळावे. वेळेचे व्यवस्थापन, अभ्यासाचे नियोजन व सकारात्मक दृष्टिकोन या त्रिसूत्रीचा अंगीकार केल्यास परीक्षेच्या भीतीवर सहज मात करता येईल. ऑल द बेस्ट!
२. दिव्य मराठी. कॉम
आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या. काही प्रश्न असतील तरीही विचारावेत.
ReplyDelete