नाहीतर पंचविशीत हार्ट अँटॅक हा ट्रेंड होईल!!

 हजारो ह्रदयविकारी रूग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांचे जीव वाचविणार्या ४१ वर्षांच्या डाॅ. गौरव गांधी यांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी गुजरातमधील जामनगरात हे घडले. 

माझ्याकडे २० ते ३० वर्ष वयाचे तरूण ब्लड प्रेशर घेऊन मोठ्या संख्येने येत आहेत. या वयात रक्त पातळ व्हायच्या गोळ्या चालू करायला लागाव्यात असे का घडत आहे?

डाॅ. गौरव गांधी यांना व्यसन नव्हते. रात्री छातीत दुखू लागल्यावर त्यांनी, ईसीजी करून घेतला जो नाॅर्मल आला. पित्त समजून घरी परतल्यावर काही तासानंतर ते बेशुद्ध झाले, व्हेंटिलेटरवर ठेवले. पण उपयोग झाला नाही. पोस्ट माॅर्टेम मध्ये ह्रदयात कोणतेही बदल दिसले नाहीत. कारण लक्षणे उद्भवणे आणि मृत्यू यामधील वेळ अत्यंत कमी असेल तर ह्रदयात खुणा सापडत नाहीत. ७ तासाच्या कालावधीत त्या मिळतात. 

ह्रदयविकार झटक्यांच्या ३०% केसेसमध्ये ईसीजी नाॅर्मल येतो. अशावेळी हाॅस्पिटलात पुढे २४ तास रहाणे अनिवार्य ठरते. ईसीजी ठराविक अंतराने करणे आणि रक्तातील ट्रोपोनीन व क्रियाटीनीन व अन्य चाचण्या  तपासाव्या लागतात. 

तरूण वयात ह्रदयविकार वाढले आहेत कारण स्ट्रेस वाढलाय. मानसिक ताण, मोबाईलमध्ये रोज ५-६ तास डोके खुपसून बसणे, सोडियम-प्रिझर्हेटिव्ह अशी फास्ट फूड आणि भजी-वडापाव-सामोसा रोज खाणे, सर्व व्यसने, आणि पैसा कमावण्यासाठी जीवघेण्या स्पर्धेत स्वतःला ठोकून बसविणे ही कारणे काॅमन आहेत. 

बीपी चेक करणे, कोलेस्टेरॉल चेक करणे, ह्रदयातील रक्तवाहिन्या बंद पडल्यात का तपासणे गरजेचे असते. ह्रदयविकार झटक्यात तात्काळ मृत्यू होण्यामागे या रक्तवाहिन्यातील गुठळ्या किंवा ब्लाॅक असण्यापेक्षा ह्रदयातील विद्युतस्पंदने थांबण्याचे कारण महत्त्वाचे ठरते.

आज परिस्थिती अशी आहे की डोक्यात ताण घेऊन कामं करणार्यांची संख्या अफाट आहे.  ताणतणावाचे नियोजन करण्यासाठी सायकाॅलाॅजिस्ट गाठणे हसण्यावारी नेले जाते. ताणतणाव निर्माण करणारी कारणे मनोवैज्ञानिककडून समजून घेण्यासाठी खुद्द डाॅक्टरांनाच वेळ द्यावासा वाटत नाही. एखादे मेडिटेशन शिबिर केले म्हणून हार्टअॅटॅक यायचे थांबत नाही. 

मनातील भीती आणि ताण घालवायचे असतील तर त्यांना भिडूनच घालवावे लागतात. त्यांच्यापासूनू पळून जाऊन नव्हे किंवा लपवून ठेवून नव्हे!

यंगस्टर्स साठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. नाहीतर पंचविशीत हार्ट अॅटॅक हा ट्रेंड होईल!!

- डाॅ.प्रदीप पाटील

Comments

Popular posts from this blog

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

परीक्षेची अवास्तव भीती (एक्झाम फोबिया)

स्त्रियांची एनर्जी