तंत्रसाक्षरता आणि महिला
स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण वाढत असले तरी, डिजिटल जगातला वावर वाढला असला, तरी त्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी आहे. एवढेच नव्हे, तर प्रौढ साक्षर स्त्रिया अजूनही डिजिटल विशिष्ट छोट्या व जुजवी वर्तुळात फिरत आहेत. व्हॉटसअॅप, ई - मेल, मेसेज, नेटवरून माहिती शोधणे वगैरेबाबतही माहिती घेण्यात त्या मागे राहतात. त्याचे कारण उत्सुकता व कल नसणे. दुसरे म्हणजे त्या वस्तू वापराबद्दलची भीती. तिसरे म्हणजे आत्मविश्वास नसणे. डिजिटल अवकाश न विस्तारलेल्या स्त्रियांची संख्या मोठीच आहे. शिक्षण हा व्यक्तिमत्त्व विकासाचे साधन आहे आणि त्या विकासात डिजिटल विश्व आणि तंत्र वापर ही अपरिहार्यता आहे ; मात्र जनरल एज्युकेशनमधून अगदी पदवी - पदव्युत्तरपर्यंत सामान्य शिक्षणात डिजिटल प्रशिक्षण व ज्ञान शिकविले जात नाहीच. खरे तर, तसे कौशल्य शिकण्याची आवड व माहिती ज्ञान मिळविण्याची जिज्ञासा हवी, ज्याची कमतरता स्त्रियांमध्ये आढळते. नकारात्मक भावना असते त्याबद्दल. कोरोना काळात मुलांच्या ऑनलाईन शिक्षणामुळे लिंक पाहणे व पाठवणे, मेसेज करणे, डेटा संपत आल्याची माहिती घेणे, ट्विट पाहणे संवाद साधणे हे करण्यात मुलेच आता बाकबगार होत आहेत. स्त्रिया त्याची माहिती करून घेत असल्या, तरी नाखुशीने व नाईलाजानेच बहुधा. त्या डिजिटल क्षेत्रातील कार्यात्मकता, रचनात्मकता व तत्परता ही त्यांच्याकडे कमीच वा आत्मसात करण्याचा उत्साह व वेग तसा फार वेगवान नाही.
सिलिंडरचा नंबर लावणे, मोबाईलवरून ऑनलाईन पेमेंट, क्रेडिट कार्ड व डेबीट कार्डचा वापर ऑनलाईन खरेदी, पार्सल मागवणे, नेटच्या वापरातून माहिती मिळवणे, ई - मेल वगैरे गोष्टी अगदी सहजतेने हाताळण्याचा विश्वास महिलांकडे असतोच असे नाही. टेलिशिक्षण, टेलिव्यवहारांची हाताळणी स्त्रियांकडून व्हावी म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जननोन्नती मिशनने डिजिटल मार्केटिंगच्या वेबसाईटवर मास्क उत्पादन व व्यापारासंबंधी महिला बचत गटांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण शिबिरे घेतली. पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानामार्फत ३०० कोटी रुपयांची तरतूद केली . त्यातील ४० टक्के हिस्सा मुली व महिलांसाठी आहे अशा योजनांचा फायदा महिलांनी घ्यायला हवा.
नवकल्पना, तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांमध्ये स्त्रियांचे योगदान कमी आहे , ते वाढायला हवे . सेवा क्षेत्रात त्यांना रोजगार संधी आहेत ; मात्र डिजिटल ज्ञान व पारंगतता मिळविली पाहिजे. स्टार्टअप क्षेत्राला सरकार प्राधान्य व उत्तेजन देत आहे. त्यासाठीही डिजिटल अवकाश आत्मसात हवे व त्यात तज्ञता हवी. आज भारतात केवळ २९ टक्के स्त्रिया इंटरनेट वापरत आहेत. वेब सीरिजमधील स्त्रियांचे चित्रण बदलायला लागले आहे. 'मेड इन हेवन', 'फोर मोअर शॉटस् प्लीज', 'लैला', 'क्वीन', 'आऊट ऑफ लव्ह', 'लाखों में एक किंवा 'मॉम' अशा वेबसीरिजमधून महिला व्यक्तिरेखा बघायला मिळतात. याचे कारण ओटीटी फ्लॅटफॉर्मवर जाऊन असंख्य स्त्रिया आता सीरिज बघायला लागल्या आहेत ; मात्र त्यातून काय शिकायचे ? हे कितीजणांना उमगले आहे, कोण जाणे !
डिजिटल क्षेत्रात व जगतात रमलेल्या स्त्रियांना बघताना आनंद वाटतो ; मात्र त्यांचे प्रमाण एक विशिष्ट दर्जाच्या कुटुंबात, वयोगटात व शिक्षण घेतलेल्यांमध्येच आढळते. सर्वच शिक्षकांनी व सर्व स्तरातल्या टिचर्सनी तंत्रस्नेही बनायला हवे. त्यांनी स्वतःला अद्ययावत करायला हवे, तरच शिकणाऱ्यांचे ज्ञान व कौशल्य वाढेल व तंत्रस्नेही बनतील. मुलींना विशेष करून तंत्रज्ञानात्मक प्रकल्प करण्यास प्रोत्साहन द्यावे. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्र, सेवा क्षेत्रात स्त्रियांना विशेष प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे व होणार आहे. म्हणून आधुनिक युगात महिलांनी डिजिटल अवकाशात शिरकाव करून तज्ञता मिळवावी. मग, सबलीकरण नक्कीच वाढेल. स्त्रिया स्वयंसिद्धा होतील .
डॉ. लीला पाटील
Comments
Post a Comment