मॅनेज युअर अँगर (राग व्यवस्थापन)

राग ही खूप प्रखर; पण सामान्य भावना आहे. रागाची तीव्रता व्यक्तीपरत्वे बदलत असते. रागाची तीव्रता खूप वाढली, तर रागाचे रूपांतर संताप आणि हिंसेमध्ये होऊ शकते. ही गोष्ट राग येणाऱ्या आणि राग आलेल्या व्यक्तींच्या सान्निध्यात असलेल्या व्यक्तींसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे रागाचे योग्य वेळी, योग्य रितीने व्यवस्थापन करता येणे ही एक कौशल्याची गोष्ट आहे.


आजच्या गतिमान जीवनशैलीत ताण, वैफल्य, भिती, असुरक्षिततेची जाणीव, दहशत, अपेक्षाभंग इत्यादी गोष्टींचे प्रमाण वाढलेले आहे. याचा परिणाम 'राग' या सर्वात जास्त नकारात्मक असलेल्या भावनेच्या प्रदर्शनातून व्यक्त होत असतो. यामुळे मोठ्या प्रमाणावर 'राग' ही भावना जन्माला येते. विविध वयांतील अनेक माणसे रागावर नियंत्रण कसे करावे, याची विचारणा करत असतात. यावरूनच ही भावना खूप प्रखर असल्याचे लक्षात येते. म्हणूनच योग्य वेळी, योग्य रितीने रागाचे व्यवस्थापन करता येणे ही एक कौशल्याची गोष्ट म्हणून आत्मसात करण्यास काहीच हरकत नाही. त्याची सुरुवात आपण प्रथम रागाची कारणे शोधून करूया. ही कारणे पुढील प्रमाणे विभागू शकतो.


* रागास जबाबदार व्यक्तींमधील अंतर्गत घटक

व्यक्तिमत्त्व प्रकार

हामोर्न्सचा परिणाम

वैफल्यग्रस्त राहण्याची प्रवृत्ती

द्वेषभावना

समस्या निवारण कौशल्याची कमतरता

सतत आणि सहज चिंताग्रस्त होण्याची प्रवृत्ती


*राग येण्यास जबाबदार बाह्य घटक

नकारात्मक पालकनीती

मित्रांचा प्रभाव

सामाजिक आणि आर्थिक घटक

प्रसारमाध्यमांचा प्रभाव

परिस्थितीजन्य घटक

सामाजिक ताण इ.


दैनंदिन जीवनात राग उत्पन्न करणाऱ्या अनेक घटना आपल्या सभोवताली घडत असतात. त्याचप्रमाणे बरेचदा आपल्याला इतरांचा रागही सहन करावा लागतो. अँरिस्टॉटलने रागाचे खालील पाच प्रकार सांगितले आहेत.

१. योग्य व्यक्तींवर रागावणे

२. योग्य प्रमाणात रागावणे

३. योग्य वेळी व्यक्त केलेला राग

४. राग उत्पन्न करणारे विचार

५. आपल्या डोक्यात का येतात?

कोणत्याही घटनेमुळे आपल्याला राग येत नाही किंवा एखाद्या गोष्टीचा अन्वयार्थ एखादी व्यक्ती कशी काढते यामुळेही आपल्याला राग येतो. ज्या व्यक्ती मोकळ्या मनाच्या आणि विचारांच्या नसतात, त्या इतरांविषयी दूषित पूर्वग्रह बाळगतात. इतरांच्या बारीकसारीक गोष्टींचा संशय घेतात. ज्या व्यक्ती स्वभावत: रागीट असतात, त्यांना अत्यंत क्षुल्लक कारणही राग येण्यास पुरेसे असते.

या विचारांवर नियंत्रण कसे करता येते ?

स्वत:तील अहम् बाजूला ठेवून राग स्वीकारायला शिकणे

रागाचे प्रमुख कारण ओळखणे आणि ते समूळ नष्ट करण्यास शिकणे

रागाला कारणीभूत कारणांचा अभ्यास करणे

तुमचा राग योग्य आहे अथवा अयोग्य याचा विचार करा

रागाचे व्यवस्थापन आवश्यक

राग ही एक अतिसामान्य भावना आहे. रागाची तीव्रता व्यक्तीपरत्वे बदलत असते. ही तीव्रता खूप वाढली, तर त्याचे रूपांतर संताप आणि हिंसेमध्ये होऊ शकते. ही गोष्ट राग येणाऱ्या आणि राग आलेल्या व्यक्तींच्या सान्निध्यात असलेल्या व्यक्तींसाठी घातक ठरू शकते. राग येणाऱ्या व्यक्तींच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर अनेक दीर्घकालीन परिणाम होतात. उदा. ती व्यक्ती मानसिकरित्या दुबळी होत जाते. इतर व्यक्तींबरोबर जुळवून घेणे शक्य होत नाही. त्याचप्रमाणे काही गंभीर शारीरिक आजार, जसे हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह इत्यादींची कायमस्वरूपी शरीरात घर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच अशा वेळी रागावर नियंत्रण करण्यासाठी प्रथम त्याचे व्यवस्थापन करणे हे अत्यंत गरजेचे असते.

यासाठी आपण खालीलप्रमाणे सुरुवात करू.

कोणती गोष्ट तुमच्या रागास कारणीभूत ठरते याचा चिकित्सात्मक विचार करा. उदाहरणार्थ, आपल्या वैयक्तिक गरजा पूर्ण होत नाहीत, ठरवल्याप्रमाणे कामे होत नाहीत. त्यामुळे दु:ख, भिती, असुरक्षिततेची जाणीव होऊन राग येतो. वास्तविक रागामुळेच या भावनांची जाणीव होते. हवे ते मिळवण्यास आपण असमर्थ असतो आणि हतबल होतो; पण रागामुळे अशा परिस्थितीमध्ये आपले नुकसानच होते.

आंतरवैयक्तिक संबंध खालावले असल्यास राग ही प्रबळ भावना निर्माण होते.

भावनिक उद्विग्नतेची अनुभूती येणे, भावनांवर ताबा न राहणे

* रागावर नियंत्रण मिळविण्याची तंत्रे

■अपेक्षांमध्ये सुधारणा आणि बदल तुम्हाला रागावर नियंत्रण करण्यास मदत करू शकेल.

■ इतरांना समजून घेण्याची क्षमता वाढवणे

■ ज्या गोष्टी करण्यात आपल्याला आनंदाचा अनुभव येतो त्या गोष्टी करण्यामध्ये स्वत:ला रमवणे

■संगीत ऐकणे, गाणे या गोष्टी शरीर आणि मनाला प्रसन्नता देतात. यामुळे तुम्ही रिलॅक्स होता.

■ सृजनात्मक कृती, जसे की चित्रकला, हस्तकला, विणकाम, भरतकाम, कथा, कविता ऐकणे, नवीन पाककृती करणे यामुळे राग शांत होण्यास मदत होते.
विनोद सांगणे, ऐकणे, वाचणे, विनोदी मालिका बघणे यामुळे रागाची पातळी कमी होते. मन हलके आणि प्रफुल्लित होते.

■ जेव्हा तुम्हाला राग येतो, तेव्हा दहा ते शंभर अंक मोजा. यामुळे लवकरच तुमचा राग कमी होईल. तुमचा राग कमी झाल्यावर तुम्ही कोणतीही चुकीची किंवा अयोग्य भाषा बोलणार नाही.

■ ध्यान किंवा मेडिटेशन करणे

जर तुम्ही तापट किंवा रागीट अशा स्वभाव प्रकारामध्ये मोडत असाल, तर ध्यान किंवा मेडिटेशन हे तुमचा स्वभाव शांत करण्यास खूप मदत करतील. ध्यान करण्याने सारखे राग येण्याचे प्रमाण कमी होते आणि तुम्ही शांत होऊ लागता.

■ तुम्ही एखाद्या तणावपूर्ण घटनेला सामोरे जाणार असाल, तर स्वत:साठी थोडा वेळ काढून वरीलपैकी एखादी कृती करून स्वत:ला तणावमुक्त करा. मगच कामाला सुरुवात करा. तुमच्या मदतीला जोडीदार निवडा. तो तुमचा लग्नाचा जोडीदार असू शकले. एखादा मित्र, नातेवाईक किंवा अशी एखादी व्यक्ती असू शकते, की जिच्याशी तुमचे चांगले जमते किंवा तुम्ही त्या व्यक्तीशी मोकळेपणाने आणि विनासंकोच बोलू शकता. अशा व्यक्तींच्या मदतीने तुम्ही मन हलके करून रागावर नियंत्रण मिळवू शकता.

■ स्व-संवाद 

'मी आज रागावणार नाही.' 'मी आठवडाभर कोणाही बरोबर भांडणार किंवा ओरडून बोलणार नाही.' स्वत:ला दिलेल्या या अशा सूचनांच्या मदतीने तुम्ही तुमच्या वागणूकीत हळूवार पण कायमस्वरूपी मदत करू शकाल.

■ राग निर्माण होणाऱ्या जागेवरून स्थलांतर करा. तुम्हाला जर वाटत असेल, की एका विशिष्ट घटनेमुळे किंवा व्यक्तींमुळे तुम्हाला राग येतोय, तर अशा ठिकाणाहून स्वत:ला लगेच दूर करा. तुम्ही आपोआप शांत व्हाल.

■ज्या व्यक्तींवर तुम्ही रागावला आहात, तिला भेटण्यापूवीर् स्वत:चा राग शांत करा. मगच त्या व्यक्तीला भेटा.

राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. तेव्हा रागावर नियंत्रण मिळवाल तरच यशस्वी व्हाल.


- नसरीन पटेल
(लेखिका मानसशास्त्रीय समुपदेशक आहेत)

Comments

Popular posts from this blog

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

परीक्षेची अवास्तव भीती (एक्झाम फोबिया)

स्त्रियांची एनर्जी