प्रेमविवाह: प्रेम आणि विवाह, प्रेम की विवाह

 

अक्षय वय वर्ष 30 उच्चशिक्षित, बिझिनेस एकहाती उत्तमरित्या सांभाळणारा, घरात एकुलता एक असल्याने लहानपणापासून च सगळ्यांचा लाडका, हरहुन्नरी, हुशार, मनमोकळ्या स्वभावाचा... नुकतंच चार वर्षांपूर्वी लग्न झालं. बायको अस्मिताही दिसायला गोरी गोमटी, नाजूक, प्रथितयश कंपनीत उच्चपदावर काम करणारी.... घरच्यांना आवडलेली... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अक्षयवर जीव ओळवून टाकणारी... इतकं सगळं छान सुरळीत सुरू असताना अक्षय ला माझी आठवण का यावी हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.....तर झालं असं की अक्षय एकदा असाच खूप व्यथित होऊन त्याच्या एका मैत्रिणीशी बोलायला गेला आणि तिने त्याला माझ्याकडे पाठवलं...

अक्षय आणि अस्मिताचं love marriage होतं... पण सध्या दोघांमध्ये सारख्या कुरबुरी सुरू होत्या. छोट्या छोट्या कारणांवरून त्या दोघांमध्ये मोठमोठी भांडणं व्हायला लागली होती आणि आपसूकच याचा परिणाम त्यांच्या घरावर व्हायला लागला होता. एक अशांतता पसरली होती. आणि या प्रॉब्लेम वर दोघांनाही तोडगा काढता येत नव्हता.. साधारण 12 वर्षांचं नातं आणि 3 वर्ष लग्नाची अशी एकूण १५ वर्ष ते एकमेकांना ओळखत होते... पण तरीही कुठेतरी काहीतरी कमी पडत होत. आणि आपण प्रेम करत होतो ती नक्की हीच व्यक्ती का ? असा त्यांना प्रश्न पडत होता....  तुम्हाला आम्हाला वाटेल की वाद कोणत्या नवराबायको मध्ये होत नाहीत... त्यात एवढं ते अगदी counsellor पर्यंत जाण्यासारखं काय आहे... नाही ती कौतुकं नुसती... 

पण त्या दोघांच्या जागी जाऊन याचा विचार केला तर १५ वर्ष एकमेकांना ओळखून पण ते अनोळखी आहेत की काय असं वाटत होतं त्यांना.. त्यांचा प्रॉब्लेम अजून थोडा समजून घेण्यासाठी मी काही प्रश्न विचारले की नक्की काय प्रॉब्लेम होतोय त्यावर अक्षय म्हणाला की तिला मला समजूनच घ्यायचं नसतं... सारखी लहानसहान गोष्टीसाठी हट्ट धरायचा.... आज तू जेवायलाच नाही आलास, मग पिच कलर चा कुर्ताच का आणला light green का नाही आणला, मग आईबाबांबरोबर च का जातोस सारखा, मला वेळच देत नाहीस, सांगून च बाहेर जात नाहीस, माझ्यापासून पैशांचे व्यवहार लपतोस, मित्रांबरोबरच फिरत असतोस... जबाबदारी म्हणून नाही तुला, तुझी बहीण सारखीच आपल्या बरोबर का येते... आणि मग पेटंट डायलॉग असतोच की लग्नानंतर तू बदलला आहेस... माझी किंमतच नाहीये.... आधी कसा वेळ होता आता कसा नाहीये..... अगदी वैतागलोय मी... म्हणजे मी अगदी पूर्ण बरोबर आहे असं नाही... पण म्हणून पूर्ण चूक माझीच नाहीये ना... म्हणजे मला तर कधी कधी वाटतं की ती हे प्रॉब्लेम मुद्दाम शोधून काढते... आता मला सांगा मला २४ तास हिच्याबरोबर कसं राहू मी? आणि इतक्या वर्ष काही गोष्टी करत आलोय, मित्रांसाठी, घरासाठी, बहिणीसाठी अशा कशा सोडून देऊ अचानक??? आणि हीच म्हणायची तुझं हे असं सगळ्यांसाठी धावून जाणं च प्रेमात पडायला भाग पाडतं मला आणि मग आता काय आटले प्रेम?? आणला कधीतरी मी माझ्या चॉईस ने कुर्ता तर माझ्यासाठी घालू शकतेच ना ती??   आणि मग असं झालं की मी अजूनच मुद्दामहून ती predict करते तसं वागतो....  आजकाल तर मला वाटतं लग्न करून चूक केली की काय हिच्याशी...

त्याच पूर्ण ऐकून घेऊन मी त्याला विचारलं की लग्नाआधीची १२ वर्ष तीने अजिबातच हट्ट केला नाही आणि अचानक करतेय असं वाटतंय का तुला? किंवा लग्नाआधी कधीच ती असं म्हणाली नाही की मला फक्त तू हवा आहेस... सगळ्यांबरोबर काय भेटायचं आपण दोघंच भेटू कधीतरी.... त्यावर तो म्हणाला हो ती हे म्हणायची बऱ्याचदा मग आम्ही प्लॅन च तसा करायचो आठवड्यातली एक संध्याकाळ फक्त आमच्या दोघांची असायची... बाकी दिवस आम्ही सगळ्यांबरोबर असायचो... आणि म्हणलं हट्टाबाबतीत काही आठवतंय??? मग म्हणाला हो तशी हट्टी होतीच ती लहानपणापासून तिची आई पण सांगते ना... पण मला वाटायचं लहान आहे, अल्लड आहे, लाडात वाढलीये जबाबदारी पडली की होईल बदल हळू हळू पण नाहीच हो... पण मग तू तेव्हा तिचे हट्ट कसे पुरवायचास? म्हणाला सगळ्या गोष्टी manage करून... काही पुरवायचो कधी कधी अति होतंय हे समाजवायचो.... मग मी त्याला म्हणलं या सगळ्याचा तू खोलवर विचार करायचा म्हणालास तर ती आणि तू दोघंही तसेच आहात... थोडाफार वयानुसार झालेला बदल सोडला तर तुमचा मूळ स्वभाव तोच आहे आणि पूर्वी ज्या गोष्टी फक्त तुमच्या दोघांच्या होत्या त्यात आता काही फॅक्टर्स add झाले आहेत त्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेणं जरा जड जातंय, असं काहीसं होतंय का? म्हणाला हो खरंच की मॅम ती तशीच आहे आधीपासूनच लग्न झालं की बदलेल हळू हळू हे मला वाटतं होतं... पण तिने बदलावं असं वाटतं हेही मी तिला सांगितलं नाहीये..... म्हणलं म्हणजे कुठेतरी तुम्ही एकमेकांना गृहीत धरून चालला होतात की थोड्या वर्षांनी ही बदलेल किंवा हा बदलेल... पण प्रत्यक्षात आत्ता तसं होत नाहीये म्हणून तुमची भांडणं होतायत.... एकमेकांना काय अपेक्षित असेल हे तुम्ही एकमेकांना विचारात न घेता तुमच्या दृष्टिकोनातून करायचा प्रयत्न करत आहात आणि मग खऱ्या अपेक्षा बाजूलाच राहतायत.... अशा अजून बऱ्याच गोष्टी अक्षय च्या लक्षात आल्या आणि त्याला कळलं की माणूस चूक नाहीये आपल्या दोघांना प्रेम आणि लग्न यामधील transition जमत नाहीये. 

कधी कधी प्रेम आणि लग्न या स्थित्यंतरामध्ये आपण आपल्या पार्टनर ला गृहीत धरतो... आणि मग प्रेमात जो स्वभाव गोड, किंवा डॅशिंग वाटत असतो त्याच्याशीच प्रॉब्लेम वाटायला लागतो... कधी कधी आपल्याला आपल्या पार्टनरचे negative पॉईंट्स बघायचेच नसतात...किंबहुना बघूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो... आपल्याला वाटतं की तो नंतर बदलेल... पण ही आपली न बोलून दाखवलेली ईच्छा असते आणि हे समजून घेऊन त्याने/ तिने बदलावं ही अपेक्षा असते... त्याच्या/तिच्या अपेक्षांचा विचार आपण आपल्या दृष्टिकोनातून करत असतो..... ZNMD मधल्या डायलॉगचा मला इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.. कल्की अभयला म्हणते.... शादी के बाद थोडेना तुम ऐसें boys ट्रिप पे जाना पसंद करोगे.... असंच काहीसं आपलंही होतं... आणि इकडे खरी सुरवात होते नात्यामध्ये  गडबड व्हायला.  मग कोणीतरी एकच  जण चरफडत अपेक्षा पूर्ण करत राहतो... आणि ओझ्याखाली दबून जातो.. किंवा कोणाचीच अपेक्षा पूर्ण होत नाही आणि भांडण होत राहतात... आरोप प्रत्यारोप सुरू होतात आणि एक छान हेल्दी नातं दुःखद शेवटाकडे जायला लागतं... 

आणि आपण हिच्या आईवडिलांना सांग, त्याच्या बहिणीकडे तक्रार कर, मित्राकडे मन मोकळं कर असं करत हे छोटे छोटे वाद निकोपाला जातात..  यासगळ्याच solution एका छोट्याश्या गोष्टीत असतं...  पण ते सोडून आपण मात्र बाकी सगळं करत असतो... ते म्हणजे संवाद... म्हणून एकमेकांशी संवाद साधा.. एकमेकांबद्दल च्या अपेक्षा clearly सांगा... कोणत्या गोष्टी तुम्ही स्वीकारू शकता कोणत्या अजिबातच स्वीकारता येणं शक्य नाही याबद्दल बोला... वाद/ मतभेद हे प्रत्येक जोडप्यामध्ये होतात पण आपल्यासाठी वाद महत्वाचा आहे की माणूस हा विचार करण्याचा प्रयत्न करा... चिडलेल्या अवस्थेत हे शक्य नाही पण शांत झाल्यावर आपल्या पार्टनर ची बाजू ऐकून घ्यायचा प्रयत्न करा... 

प्रत्येकाला हे लागू होईलच असं नाही काही नाती याला अपवाद असूच शकतात पण जिथे शक्य आहे तिथे आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो ना...  नाहीतर या मॅरेज मधून लव्ह निघून जातं आणि ते दोघे जगासाठी फक्त एक विवाहित जोडपं/ married couple म्हणून जगायला लागतात.... 


नेहा पेंडसे
समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ

Comments

Popular posts from this blog

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

परीक्षेची अवास्तव भीती (एक्झाम फोबिया)

स्त्रियांची एनर्जी