भावनांची गडबड

माझ्या ओळखीतले एक नवरा बायको सध्या कोविड पॉझिटिव्ह आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या बिल्डिंग मध्येच दोन-तीन फॅमिलीने एकत्र जमून गेट-टुगेदर केलं आणि नेमकं त्या पार्टीतले काहीजण पॉझिटिव्ह आले. त्यातच हे दोघे सुद्धा होते. सुदैवानी मुलगा मोठा आहे, तो निगेटिव्ह आहे. तसंच दोघांनाही काही त्रास नव्हता.  पंधरा दिवस दोघं घरातच क्वारनटाईन  झाले. 

यात त्यांची प्रचंड भांडणं झाली. 'त्या पार्टीला यायचा तू मला आग्रहच का केला? 'असं म्हणून बायको नवऱ्यावर चिडत राहिली. ' आपण कुठून त्या पार्टीला गेलो? ' असे विचार सतत त्या नवऱ्याच्या मनात येत होते आणि त्याला प्रचंड नैराश्य आलं.

त्यांच्याशी वेगवेगळं आणि एकत्रितपणे फोनवर बोलताना माझ्या लक्षात आलं राग, अपराधीपणा, नैराश्य, एकटेपणा अशा अनेक नकारात्मक भावनांचा त्यांना त्रास होत होता. दोघं सतत नकारात्मक विचार करत होते. हे स्वाभाविकच आहे. कारण आपल्यावर कुठलंही संकट येतं, समस्या येतात तेव्हा नकारात्मक विचार सुरु होतात. ते बरेचदा प्रश्नार्थक असतात.

माझ्याच बाबतीत का?

माझं नशीब असं कसं?

तू का मला तिकडे नेलंस?

मी त्याचं का ऐकलं?

मी का त्यावेळी तिकडे गेले?

काही अडले होते का तिकडे जायचं? 

असे प्रश्न सुरू होतात.

'हे आपल्याच बाबतीत का घडलं?' या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कोणीही देऊ शकणार नाही. मग याचं सोपं उत्तर शोधलं जातं. ते म्हणजे कोणाला तरी दोष देणे.

त्यामुळे आपण नशिबाला,स्वतःला किंवा इतरांना दोष देत बसतो आणि मग जर-तरच्या भोवऱ्यात अडकतो.


जर त्यांनी आम्हाला तिथे बोलावलंच नसतं तर....

जर आम्ही तिकडे गेलोच नसतो तर....

जर तू माझं ऐकलं असतं तर.....

आणि त्याच्यातून होते नकारात्मक भावनांची गडबड...


या गडबडचं स्पेलिंग केलं तर त्यातून आपल्याला सगळ्या नकारात्मक भावना मिळतील.

                GADBAD

G- Guilt - अपराधीपणा

A- Anger- राग

D- Depression- निराशा

B- Blaming- दोष देणे

A- Anxiety- चिंता

D- Disgust -  तिरस्कार

आणि या गडबडीची तीव्रता वाढली तर नातेसंबंध बिघडणे, प्रतिकारशक्ती कमी होणे, रक्तदाब, ब्लड शुगर वाढणे असे शारीरिक परिणाम ,मानसिक त्रास,मानसिक आजार असे कितीतरी दुष्परिणाम होऊ शकतात. आणि आपल्यावर जी समस्या आलेली आहे ती तर सुटत नाहीच.

मग यावर उपाय काय?

तर ज्या प्रश्नाला उत्तर नाही असा प्रश्न स्वतःला सतत  विचारत राहायचं नाही.

असे प्रश्न विचारून परिस्थितीत काहीही बदल होत नाही.

 ते प्रश्न जोपर्यंत आपण स्वतःला विचारत राहू तोपर्यंत आपण मार्ग काढण्याचा कुठलाही प्रयत्न करू शकत नाही.

वर उल्लेख केलेल्या नवरा-बायकोच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी हे प्रश्न विचारणं बंद केलं. जर-तरच्या भोवऱ्यातून ते बाहेर पडले. भावनांची गडबड कमी झाली.  आता पंधरा दिवस तर घरात बसायचं आहे हे त्यांनी मान्य केलं आणि मग आता क्वारंटाईन मधले दिवस कसे आनंदात घालवता येतील याचा ते विचार करायला लागले.

 चांगली पुस्तकं वाचली, वेब सिरीज बघितल्या, आवडते पदार्थ मागवले, जवळच्या मित्र-मैत्रिणींना फोन करून गप्पा मारल्या. एकमेकांशी तर भरपूर गप्पा मारल्या. जेव्हा त्यांनी नकारात्मक विचारांचे प्रश्न थांबवले, परिस्थितीचा स्वीकार केला तेव्हाच त्यांना हे करता आलं.

माझी आई डॉ अनिता अवचट हिला जेव्हा कॅन्सर झाला तेव्हा ,' हे असं कसं झालं? तुझ्यावरच कशी ही वेळ आली?' असं म्हणणाऱ्या जवळच्या लोकांना तिने समजावून सांगितलं की असे प्रश्न विचारण्यापेक्षा आपण मला हा आजार झाला आहे याचा स्वीकार करू आणि प्रश्नच विचारायचे असतील तर' यावर चांगले उपचार कुठले घेता येतील ? कुठल्या डॉक्टरचा सल्ला घेता येईल? असे प्रश्न विचारू. कारण हे विधायक प्रश्न आहेत. त्यातून आपल्याला काही तरी मदत होईल.

 'ज्या प्रश्नाला उत्तर नाही तो प्रश्न कधीच स्वतःला परत परत विचारायचा नाही'ही तिची शिकवण आम्ही मुक्तांगण मध्ये येणाऱ्या रुग्णमित्रांपर्यंत पोचवायचा आमच्या परीने प्रयत्न करत असतो.

- मुक्ता पुणतांबेकर
 संचालक,
 मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

परीक्षेची अवास्तव भीती (एक्झाम फोबिया)

स्त्रियांची एनर्जी