आनंदी कसे राहायचे?

     बऱ्याच वेळा आपल्याला असे वाटू लागते की, आपले आयुष्य आता आपले स्वतःचे राहिलेले नाही. प्रगती करायची, मोठे व्हायचे, पुढील  आयुष्य सुखा - समाधानात घालवायचे, असे ठरवून आपण बरेच कष्ट करू लागतो आणि त्यातच बुडून जातो. कष्ट करण्यात, सदैव व्यस्त राहण्यातच आपले दिवस निघून जातात. मध्येच तब्येतीच्या तक्रारी उद्भवतात, परंतु उपचार वगैरे घेऊन आपण तो टप्पा ओलांडतो आणि पुन्हा कामात गढून जातो. आपल्या स्वप्नांवर आपण लक्ष इतके केंद्रित केलेले असते की दररोजचा आनंद घेणेही विसरून जातो.

    एकदा एक पर्यटक निसर्गरम्य प्रदेशात गेला. तेथून तो लगेचच परतला. मित्रांना सांगू लागला की, त्या प्रदेशात मला निसर्ग आणि निसर्गाच्या मध्ये ते डोंगर भिंतीसारखे उभे असल्याचे दिसले. सगळीकडे नुसते पर्वत आणि डोंगर. मला सांगण्यात आले की, ते डोंगर म्हणजेच निसर्ग, तेच सुंदर दिसतात. तेच पाहायचे असतात. आपलेही अनेकदा असेच होते. समोर आनंद उभा असतो आणि आपण वेंधळ्यासारखे दुसरीकडे आनंद शोधत राहतो. उद्याचा दिवस कसा असेल किंवा आणखी ५ वर्षांनी आपल्याकडे कोणत्या गोष्टी असतील, याचा विचार करताना, आज कसा चालला आहे, हे आपण बघतही नाही. खरे तर आज हा उद्याचा पाया आहे. उद्याकडे जाण्याच्या प्रवासातील आज हा महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रवासाची मजा अंतिम ठिकाण गाठण्यात तर आहेच, त्याशिवाय प्रवास करताना तो आरामदायी व आनंददायी होणेही गरजेचे आहे. त्यामुळेच आज आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवत राहणे आवश्यक आहे. एखादे ध्येय डोळ्यापुढे ठेवून ते गाठण्यासाठी धडपड करणे, हे महत्त्वाचे असले तरी त्यातून आपल्याला काय मिळणार आहे. याचा विचार करायला हवा. ध्येय गाठल्याने आनंद मिळेल, हे याचे उत्तर निश्चितच नसावे. आपल्याला जे ध्येय गाठायचे आहे ते कधीतरी येईलच ; मात्र ते गाठल्यावरदेखील आपण त्यावेळी आनंदी व सुखी असणार आहोत का याचा विचार करावा लागेल. आता ज्या प्रकारे आपण कामात व्यग्र राहून, सुखे नाकारून, केवळ ध्येय गाठायचे या निश्चयाने वाटचाल करीत आहोत ; हीच मानसिकता त्यावेळीही असेल, तर मग केवळ 'गाठले एकदा' असे म्हणून त्या ध्येयाकडे बघत आपण सुस्कारा सोडू की खऱ्या अर्थाने आनंदी होऊ ?

     अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी म्हटले होते, की आपण जितके आनंदी व्हायचे ठरवलेले असते, तितकेच आनंदी आपण होतो. म्हणूनच आपल्याला जास्त आनंदी व्हायचे असेल, तर आपण आपले मन तसे घडवायला हवे. भविष्यात काही तरी मिळाल्यावर मी आनंदी होईन, असे कधीही म्हणू नका, कारण तसे कधीही होत नसते. तुम्ही आता आनंदी असाल, तरच भविष्यात आनंदी राहाल; तुमच्या मनाला तसे वळण लागलेले असेल. समाजात प्रतिष्ठा असण्याचा, श्रीमंत असण्याचा आनंदी असण्याशी काही संबंध नाही. "ज्याला आनंदी असण्याची आकांक्षा आहे,  इच्छा आहे आणि आनंदी कसे व्हायचे हे जो कोणी शिकला आहे. त्याबाबतचे सूत्र ज्याला जमवता येते, तो माणूस आनंदी होऊ शकतो", असे हे साधे गणित आहे. कदाचित हे गणित इतके साधे असण्यामुळेच ते लोकांच्या मनावर बिंबत नाही. आपणा सर्वांना अवघड, गुंतागुंतीची उत्तरे हवी असतात, म्हणजे मग आपण त्या उत्तरांचे महत्त्व आपल्याला पटते व तसे जगण्याचा आपण प्रयत्न करू लागतो. त्यामुळेच, आनंदी कसे व्हावे या साध्या प्रश्नाचे उत्तर आपणास सापडत नाही. आनंदी होण्याचा निर्णय घ्यावा, असे सोपे उत्तर असूनही त्याकडे आपले दुर्लक्ष होते. अनेकदा आपल्या भोवतालची परिस्थिती अनुकूल नसते. काही गोष्टी नको त्या वळणावर जातात आणि आपण अस्वस्थ होत राहतो. अशा वेळीदेखील आनंदी राहता येणे शक्य आहे. आपण आपल्यावर स्वार होऊ द्यायचे नाही. आपले फक्त एकाच गोष्टीवर नियंत्रण असते, ते म्हणजे आपले मन. एखाद्या गोष्टीला प्रतिसाद कसा द्यायचा हे आपण स्वतः ठरवायचे आणि मनालाही तसे घडवायचे. हे अवघड आहे असे वाटले, तरी सवयीने जमून जाते. 

     नॉर्मन पील नावाच्या एका लेखकाच्या म्हणण्यानुसार, दर पाच माणसांपैकी चार माणसे आपले दुःख आपणच ओढवून घेतात. ते नेहमी दुःखी विचार करीत राहतात. जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोनही उदास असतो. उद्वेग, वाईट इच्छा, तिरस्कार, भीती आणि चिंता हे घटक त्यांच्या उदासीनतेत भर घालतात आणि ही माणसे दुःखी होत राहतात. दुःखी राहण्याचे परिणाम मोठे वाईट असतात. अशा माणसांच्या घरात नेहमी भांडणे होत राहतात, त्यांचे नातेसंबंध तुटलेले असतात. ही परिस्थिती त्यांनीच निर्माण केलेली असते. ती बदलण्याची क्षमता ही त्यांच्यात असते; परंतु ते तसे करीत नाहीत, एवढा एकच मुद्दा असतो. ती बदलण्याची क्षमताही त्यांच्यात असते ; परंतू दुःखी, आनंदी विचार मनातून घालवून त्याऐवजी आनंदी विचार करणे; जे आपल्यापाशी नाही, त्याचा विचार करण्याऐवजी आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा विचार करणे;  द्वेष, राग, तिरस्कार या भावनांऐवजी अंगी स्थितप्रज्ञता बाणवणे;  कोणत्याही लहानमोठ्या गोष्टींमध्ये सुख शोधणे व समाधानी राहणे..  हीच आनंदाची खरी गुरुकिल्ली आहे.


- कॉपी पेस्ट

Comments

Popular posts from this blog

रफू

तलाठी भरती - अर्ज भरणेची प्रक्रिया सुरू

सिंहावलोकन