वाईट विचारांचे दहन
होळी” ……. मनुष्याच्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. माणसाच्या जीवनामधे त्याला आयुष्यातील अनेक रंगछटा अनुभवायला मिळतात, सुख -दुख, चांगलं -वाईट, यश – अपयश अशा अनेक प्रसंगातून जीवन पुढे जात असते, शिशिरातील पानगळ संपून चैत्रातील नव्या फुटणाऱ्या पालवीप्रमाणे, माझ्या जीवनातील नकारात्मक घटना आणि विचारांची होळी करून जीवनात नवीन सकारात्मक यश निर्माण करायचे आहे. मागचे सर्व मनातून स्वच्छ करून नव्या जोमाने नवीन दिवसाला सामोरे जायचे आहे. माझेही आयुष्य विविध रंगछटांच्या प्रसंगाने भरलेलं आहे, उगवती आणि मावळतीचा रंग जरी केशरी असला तरीही दोन्ही रंगातील तेज वेगवेगळ आहे, जसे समुद्राच्या पाण्याचे विविध रंग वेगवेगळ्या क्षणांमधे आपण अनुभवतो तसेच अवकाशाचे अनेक रंग प्रत्येक दिवशी अनुभवत असतो. रोजचे आकाश आणि त्याचा रंग काही वेगळाच असतो. जीवन हे विविधतेने नटलेलं आहे. जसे अन्न सेवन करतांना मला सगळे रस रंग रूप हवेसे वाटतात, तसेच जीवनातील प्रत्येक प्रसंगातून मला हवा असलेला अर्थ आणि सकारात्मक विचाराचा रंग शोधून काढल्यास जगणे अधिक प्रसन्न आणि चैतन्यमय होऊन जाईल. मग चलातर या निमित्ताने माझ्या मनातील सर्व नकारात्मक आणि घडून गेलेल्या प्रसंगांना विवेक अन विचारांचा अग्नी देऊन नष्ट करूयात आणि उत्साहाने पुनश्च एकदा नवतेजाचे आणि नवउर्जेचे रंग जीवनात मिसळून आयुष्य अधिक आनंदित आणि प्रफुल्लीत करूयात. तुम्हाला जीवनाच्या अनेक रंगछटा अनुभवण्यास मिळाव्या आरोग्यरंग, यशोरंग, आनंदरंग, असे विविध रंग सुखरंगात मिसळावे आणि जीवन सुख समृद्धमय व्हावे. यशोशिखराकडे जाणार्या तेजोमय आणि प्रकाशमय अशा जीवन प्रवासास मनपूर्वक शुभेच्छा –
डॉ. पराग काळकर
Comments
Post a Comment