गरज आत्मविश्लेषणाची
स्वतःच्या वर्तनाचे, कृतींच्या परिणामांचे, विचारव्यूहाचे वस्तुनिष्ठ दृष्टीने विश्लेषण करा. त्यातून स्वतःच्या क्षमतांची व स्वत:च्या वर्तनाचे, कृतीच्या परिणामांचे, विचारव्यूहांचे मर्यादांची जाणीव होईल. व्यक्तीला स्वत:चे गुण व बलस्थाने समजली तर स्वत:ची उद्दिष्टे चांगल्या प्रकारे साध्य करता येतात. प्रगती करता येते. त्यामुळे जीवनातील समाधान वाढते. समाधान ' हा अनुभव व्यक्तिसापेक्ष असतो आणि मन:स्वास्थ्य वाढविण्यास तो उपयुक्त असतो. कोणी गरिबीतही समाधानी असतो तर कोणी भरपूर पैसा, ऐषारामाची साधने असूनही असमाधानी असतो. चांगले शिक्षण, चांगली नोकरी, आधार देणारे मित्र व पालक असणाऱ्या व्यक्ती वास्तविक समाधानी असल्या पाहिजेत, पण त्यातील काही विशिष्ट, उच्च अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून असमाधानी असतात. व्यक्तीला आयुष्यात समाधान मिळवायचे असेल तर तसा विचार व्यक्तीने वारंवार करणे आवश्यक असते. स्वत:ची तुलना इतरांशी करून दुःखी होऊ नये. इतरांपेक्षा माझ्याकडे काय जास्त आहे याचा विचार करण्यापेक्षा मी दुसऱ्यांसाठी काय करू शकतो याचा विचार करावा. दुसऱ्यासाठी काम करण्यात ( त्यागात ) मोठे समाधान मिळते. भारतीय संस्कृतीत त्यागाचे मूल्य श्रेष्ठ मानतात. व्यक्तीने स्वत:च्या अपयशाच्या कारणांचेही वस्तुनिष्ठ मूल्यमापन करावे, व्यक्तीच्या मूल्यमापनातून त्याला स्वत:च्या ज्या चुका कळतात त्या व्यक्ती भविष्यात टळू शकते. आपल्या कृती परिणामांचे मूल्यमापन करून वर्तनात सुधारणा करता येणे याला अनुभवाने शिकणे म्हणतात. समायोजन साधण्यासाठी स्वत:बद्दल वास्तववादी दृष्टिकोन फार उपयुक्त असतो. स्वत:च्या मर्यादांचीही जाणीव ठेवली, तर व्यक्ती अवाजवी व अशक्व उद्दिष्ट ठेवणार नाही. त्यामुळे अपयश टळते. व्यक्तीने स्वतःचे टीकात्मक वृत्तीने मूल्यमापन करावे. व्यक्ती आपल्या दोषांना स्वीकारून त्यावर टीका करू शकली, तर ते दोष सुधारण्याचा ती प्रयत्न करेल. तेव्हा 'निंदकाचे घर असावे शेजारी.' पेक्षा ते स्वतःच्या मनात असावे. कारण दुसऱ्या व्यक्तींनी आपले दोष सर्वांसमोर दाखवले तर आपल्याला जास्त वाईट वाटते किंवा टीका करणार्यांचा राग येतो. त्यातून आंतरवैयक्तिक संबंध बिघडू शकतात. इतरांसमोर अपमान झाल्याने व्यक्तीचे मनस्वास्थ्य बिघडते. स्वतःचे विश्लेषण करताना न्यूनगंड निर्माण होऊ देऊ नका. प्रत्येक व्यक्तीत चांगले गुण असतात त्याची जोपासना आवश्यक असते.
Comments
Post a Comment