समतोल विकासाचा मार्ग
निसर्गाच्या चक्रात जगतांना स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणं ही काळाची गरज बनली आहे. किंबहुना स्वयंविकासासाठी तो एक महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु या विकासाच्या प्रवासात बहुतांशजण अर्ध्यापर्यंतही पोहोचू शकत नसल्याचे दिसून आले आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वातील गुण-दोष. स्वयंविकासातील हे अडथळे दूर कसे करायचे हे पाहूया या लेखमालेमध्ये
सर्वांगिण विकास ही संकल्पना आज अनेक ठिकाणी आपल्याला दिसत आहे. स्वत:चा विकास साधण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब केला जात आहे. परंतु दुर्देवाने हा विकास केवळ वरवरच्या स्वरुपात दिसून येत आहे. अंतर्बाह्य विकासाकडे फारसे लक्ष दिले जात नसल्यामुळे आज मानसिकदृष्ट्या कमकुवत पिढी निर्माण होऊ लागली आहे. माझ्याकडे येणाऱ्या बहुतेक व्यक्तींच्या जीवनात विकासाचा असमतोल झाल्यानेच अनेक समस्या निर्माण झाल्याचे आजवरच्या अभ्यासातून लक्षात आले आहे. एखादा मुलगा फारच चतुर, धूर्त असतो. कुणी पटकन निर्णय घेणारा असतो. कुणी फारच भोळा, गरीब असतो. हे गुण काही शंभर टक्के उपजात नसतात. तुमच्या आजूबाजूची परिस्थिती, घरातील वातावरण, पालकांचा तुमच्यावरील प्रभाव या सर्व गोष्टी थोड्या फार प्रमाणात यासाठी कारणीभूत ठरतात.
उदाहरणार्थ एका तीन वर्षाच्या मुलाला अगदी सहज अर्वाच्च्य भाषेत शिवी देतांना मी ऐकलं आणि गूपचूप त्याच्या घरच्यांच निरिक्षण केलं. त्याचे आजोबा आपण सहज एखादा शब्द उच्चारावा तशी ती शिवी उच्चारत असल्याचे मला दिसून आले. मुलांच्या टोळक्यातली ती शिवी मी ज्यावेळी त्या आजोबांना ऐकवली त्यावेळी त्यांना धक्काच बसला. हे झालं एक उदाहरण; पण दबलेली, घाबरलेली, बोलण्याची भीती वाटणारी, न्यूनगंड असलेली कितीतरी मुलं हे दोष आपल्या कुटुंबियांकडून केवळ अवलोकनातून आत्मसात करतात. त्यातूनच त्यांचे व्यक्तिमत्व घडते. त्यामुळे संस्कारातून, अवलोकनातून, अनुकरणातून जर एकांगी गोष्टींनाच मुले सामोरी जात राहीली तर असंतुलीत विकास घडतो. अशी मुले समाजात वावरतांना त्यांच्या गुणधर्मांना साजेशी संगत शोधतात. ज्यामध्ये त्यांना सहज वाटतं, सुरक्षित वाटतं. म्हणूनच म्हणतात ना, ‘मॅन इज नोन बाय हीज कंपनी’.
अनेकदा उत्तुंग यश मिळविणाऱ्या व्यक्तींही आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर निराशेच्या गर्तेत ओढल्या जातात. याचं कारण त्यांचा विकास एकांगी झालेला असतो. थोडक्यात कुठलीही टोकाची गोष्ट वाईटच, मग ते गुण असोत किंवा दोष. समाज द्वैत धर्माचा बनलाय हे नाकारुन चालत नाही. मान-अपमान, चांगलं-वाईट, योग्य-अयोग्य, श्रीमंती-गरीबी, नैतिक-अनैतिक, सज्जनता-दुर्जनता, या द्वैत धर्माच्या उपाधी स्थलकालपरत्वे समाजाला एका चाकोरीत बांधून ठेऊन, सर्वांना जीवनाच्या सर्व गोष्टींचा लाभ घेता यावा यासाठी निर्माण केल्या गेलेल्या आहेत. या कल्पना वेळोवेळी गरजेनुसार बदलत गेल्या. पण व्यक्तीच्या अंतर्मनात या कल्पनांच्या चौकटी भक्कम होत गेल्या आणि यशस्वी, श्रीमंत, निरोगी, सुखी, समाधानी, शांततापूर्ण जीवनाचं परिमाण बदलत गेलं. विपर्यास होत गेले आणि विकृती वाढल्या. बहुतेक समस्याग्रस्त व्यक्तींमध्ये निर्माण झालेल्या भीती, काळजी, चिंता, दडपण, धडधड, नैराश्य, निद्रानाश, अपराधीपणाच्या भावना, घाबरटपणा, तोतरेपणा, व्यसनं, आत्महत्येसारखे विचार, त्यासोबत डोक्याच्या केसांपासून ते तळपायापर्यंतच्या अनंत मनोशारिरीक समस्या केवळ चुकीच्या कल्पना, समजुतींमुळेच निर्माण झालेल्या असल्याचं अभ्यासातून लक्षात आलेलं आहे.
डॉ. शैलेंद्र गायकवाड
Comments
Post a Comment