फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील करिअर


        फॅशन आणि स्टाईल या बाबतीत आजकाल सगळ्याच वयोगटातील लोक जागृत आहेत. फॅशन क्षेत्रातील झगमगत्या जगाचे आकर्षण अनेकांना असते. बऱ्याचदा टी.व्हीवर रॅम्पवर आकर्षक पोशाखासाहित चालणारे मान्यवर आपण पाहतो. या सगळ्या नाविन्यपूर्ण आणि आकर्षक कपड्यांची डिझायनिंग डिझायनरने केलेली असते. हे जग खूप अद्भुत आणि विस्तारत जाणारे आहे. केवळ कपडे शिवणे हा त्याचा भाग नसून त्याच्या पलीकडेही या क्षेत्राचा आवाका आहे. टाके, टीपा, डिझायन, प्रत्यक्ष शिवणकाम, रंगसंगती, कपड्यावरील जरीकाम, आकर्षक कलाकुसर या बाबींचा त्यात समावेश असतो. आपला देश संस्कृती आणि परंपरा जपणारा आहे. जुन्या काळातील वेशभूषा नवे रुप, नवं रुपडं धारण करून पुन्हा बाजारात येत आहेत. या क्षेत्रात नव्या कल्पनांना, सर्जनशीलतेला वाव आहे. अनेक नामांकित व्यक्ती, नेते, अभिनेते, अभिनेत्री, उद्योजक, तरुणाई हे सर्वच आपल्या दिसण्याबद्दल जागरूक असतात. आजकाल अनेक कंपन्या आपल्याला हवा तसा पेहराव डिझायनही करून देतात. देशात अनेक नामांकित डिझायनर आहेत. ते सतत नव्या बदलानुसार पेहराव तयार करत असतात. भारतीय पेहराव, पाश्चिमात्य पेहराव काळानुसार बदलत राहतात आणि तशा मागणीनुसार फॅशन डिझायनरला काम करून द्यावे लागते. भारतातील फॅशन इंडस्ट्रीत मोठी उलाढाल होत असते. आजकाल भारतीय फॅशन डिझायनर हॉलीवुडपटातही नावलौकिक मिळवत आहेत. रचनात्मक कल्पनेला वाव असणारे हे क्षेत्र असून या क्षेत्रात अमाप संधी आहेत त्याबाबत सदर लेखाच्या माध्यमातून जाणून घेवूया खास करिअरनामासाठी…

पात्रता

या क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. निफ्ट सारख्या संस्थात प्रवेशासाठी लेखी परीक्षा, समूह चर्चा, मुलाखत या माध्यमातून प्रवेश दिला जातो. पदव्युत्तर पदवीसाठी किमान पदवीधर असणे गरजेचे आहे. तसेच या विषयात पदवीही संपादित करता येते. या क्षेत्रात येण्याआधी चित्रकला, होम सायन्स, कॉम्प्युटर ग्राफिक्स याचे मुलभूत ज्ञान असल्यास फायद्याचे ठरते.

आवश्यक गुण

एक यशस्वी फॅशन डिझायनर होण्यासाठी चित्रकलेची, रेखाटनाची आवड तसेच रंगसंगतीचा अंदाज बांधता यायला हवा. वेगवेगळ्या रंगांची समजही असायला हवी. तसेच निर्मिती, तंत्रज्ञान, नितीमुल्ये, संवाद कौशल्यही आणि व्यवसायाचे ज्ञानही हवे.

संधी

नवनिर्मितीचा ध्यास असणाऱ्यांना या क्षेत्रात संधींची कमी नाही. प्रोडक्शन, मार्केटिंग, फॅशन रिटेल कंपनी, ब्युटीक्स, एक्स्पोर्ट हाउस, मॅन्युफॅक्चरींग युनिट या ठिकाणी संधी मिळतील. फॅशन मिडिया क्वालिटी कंट्रोल, फॅशन एक्ससेरीज डिझायन आणि ब्रॅंड प्रमोशन, कॉश्च्युम डिझायनर, फॅशन कन्सल्टंट, टेक्निकल डिझायनर, ग्राफिक डिझायनर, प्रोडक्शन पॅटर्न मेकर, फॅशन कोऑर्डीनेटर आदी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. अनुभवानंतर स्वत:चे ब्युटीक किवा फॅशन हाउस सुरु करता येते.

कोर्स

या क्षेत्रात येण्यासाठी अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी आणि पर्ल या व्यतिरिक्त अन्य संस्थातूनही प्रशिक्षण घेता येत. फॅशन डिझायनचे तीन भाग पडतात. उदा. गारमेंट, लेदर, एक्ससेरीज आणि ज्वेलरी डिझायन. तसेच फॅशन बिझनेस मॅनेजमेंट, फॅशन रिटेल मॅनेजमेंट, फॅशन मार्केटिंग हे अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत.

वेतन

या क्षेत्रात वेतनाच्या संधी चांगल्या आहेत. सुरुवातीस १५ ते २० हजारापर्यंत वेतन मिळू शकते. अनुभवानंतर आकर्षक पॅकेजही मिळते. एकदा यातील कौशल्य आणि कलेत प्राविण्य मिळविल्यास अगदी लाखातही कमाई करू शकता.

प्रशिक्षण संस्था

• एनआयएफटी

• आयएनआयएफडी

• एसएनडीटी कॉलेज

• निर्मला निकेतन

• जेडी इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी

• नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिजाइन, अहमदाबाद

• नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिजायन, चंदीगड

• नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी, नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, गांधीनगर, बेंगलोर

• नॉर्थ इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी, मोहाली

• पर्ल अॅकॅडमी ऑफ फॅशन, नवी दिल्ली

• गवर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ गारमेंट टेक्नोलॉजी

• एफडीडीआई, नोएडा

• सिम्बॉयोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिजाइन

• इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिजाइन, नवी दिल्ली

• सत्यम फॅशन इन्स्टिट्यूट, नोएडा

• इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी, नवी दिल्ली लेखक: सचिन के. पाटील

माहिती स्रोत: महान्युज

Comments

Popular posts from this blog

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

परीक्षेची अवास्तव भीती (एक्झाम फोबिया)

स्त्रियांची एनर्जी