संगीत क्षेत्रातील करिअर

 

नवी अनुभूती देणारे करिअर - संगीत क्षेत्र

    संगीत मानवाच्या आयुष्यातील न वगळता येणारा घटक आहे. संगिताशिवाय माणसाचे आयुष्य निरर्थक होईल. सकाळची रम्य सुरुवात, दाटून आलेली कातरवेळ अशा प्रत्येक क्षणाला माणसाला संगिताची साथ सोबत मिळते. आणि त्या क्षणांना आनंददायी बनविते. भारतीय संगिताला मोठा समृद्ध वारसा लाभला आहे. पूर्वी केवळ मनोरंजन हाच संगिताचा उद्देश असायचा आता तो व्यापक झाला आहे. अनेक घराणी संगीत क्षेत्रात अजरामर झाली आहेत. संगीत भावनांची अभिव्यक्ती आहे. तानसेन, लता मंगेशकर ते अलिकडे दिवंगत गायिका किशोरी आमोणकर आदींनी हा वारसा समृद्ध केला आहे. भारतीय संगीत गायन आणि नृत्याचा संगम आहे. संगीत राग आणि तालावर आधारित आहे. त्यातील लय त्यामध्ये माधुर्य भरत असते. भारतात अनेक वाद्यांचा आविष्कार आपल्याला पहावयास मिळतो. अगदी पुरातन वारसा असलेल्या या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी आता उपलब्ध होऊ लागल्या आहेत. आजकाल अनेक वाहिन्यांवर संगीत कलेचे शो आपणास पहावयास मिळतात. त्याची अनेक तरुणांना भुरळ पडलेली दिसते. या क्षेत्रात नेमके काय हवे ? याची ज्यांना उत्तम जाणीव आहे ते स्वतःला या क्षेत्रात वेगळी ओळख मिळवून देऊ शकतात.

शैक्षणिक पात्रता



या क्षेत्रात प्रवेशासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक नाही. पण किमान बारावी पास असणे गरजेचे मानले जाते. संगिताचे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी असे पर्याय उपलब्ध आहेत. या प्रशिक्षणामध्ये संगितातील व्यावहारिक ज्ञान आणि इतिहास तसेच संज्ञा याविषयी प्रशिक्षण दिले जाते.


संगीत क्षेत्रात आवश्यक गुण


या क्षेत्रात येण्यासाठी श्रवण क्षमता उत्तम असणे आवश्यक आहे. तसेच या क्षेत्रातील नेमक्या गरजांचा आणि मागणीचा अंदाज बांधून स्वतःला विकसित करणे जमायला हवे. त्याचबरोबर श्रमाची तयारी आणि आत्मविश्वास हवा. बदलते प्रवाह स्वीकारण्याची तयारी हवी. तंत्रज्ञानाचे किमान ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच मुलभूत संगणक ज्ञान हवे.


कामाच्या संधी तसेच काय बनू शकता?


संगीत हे मोठे व्यापक क्षेत्र आहे. यामध्ये तुम्ही गायक, वादक, संगीतकार, संगीत संयोजक, साऊंड इंजिनिअर, म्युजिक थेअरेपिस्ट, संगीत कंपन्यांचे जनसंपर्क अधिकारी तसेच संगीत प्रशिक्षक बनता येईल. तसेच यातील अत्यंत महत्त्वाचा घटक प्रोग्रामर हा असतो. तो एकटा संगणकाच्या सहाय्याने अनेक कामे करू शकतो. त्याला वगळून हा प्रवास होऊच शकत नाही. चित्रपट क्षेत्र, विविध टेलीव्हिजन वाहिन्या तसेच जाहिरातींचे जिंगल्स, बातम्यांच्या वाहिन्या किवा खाजगी गायनाचे कार्यक्रम आदी ठिकाणी कामाच्या संधी उपलब्ध होतात.


प्रशिक्षण संस्था

गंधर्व महाविद्यालय, दिल्ली


    या संस्थेमार्फत कंठसंगीताचे आणि वाद्यसंगीताचे प्रवेशिका (पहिले आणि दुसरे वर्ष), मध्यमा (तिसरे आणि चौथे वर्ष), विशारद (पाचवे आणि सहावे वर्षे), अलंकार (सातवे आणि आठवे वर्ष) हे अभ्यासक्रम चालविण्यात येतात. ही संस्था नवी मुंबईच्या अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळाशी संलग्न आहे. संपर्क- २१२, दीनदयाळ उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली- 

गंधर्व महाविद्यालय मंडळ


या संस्थेचे मुख्य संगीत विद्यालय वाशी येथे असून देशभरातील १,२०० संस्था संलग्न आहेत आणि ८०० परीक्षा केंद्रे आहेत. या संस्थेत प्रारंभिक अभ्यासक्रम ते संगीत आचार्य (पीएच.डी.) हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या विद्यालयात कंठसंगीत तसेच हार्मोनियम आणि बासरी, व्हायोलीन, सतार, तबला, कथ्थक, भरतनाटय़म यांचे प्रशिक्षण दिले जाते. संपर्क- गंधर्व निकेतन, प्लॉट नंबर ५, सेक्टर- ९ अ, वाशी, नवी मुंबई- ४००७०३.

गंधर्व महाविद्यालय, पुणे


या संस्थेमार्फत वाद्यसंगीत- तबला, हार्मोनियम, नृत्याचे कथ्थक, भरतनाटय़म आणि सुगम संगीत यांचे प्रशिक्षण दिले जाते. संपर्क- ४९५, शनिवार पेठ, अप्पा बळवंत चौकाजवळ,पुणे- ४११०३०.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, स्कूल ऑफ परफॉर्मिग आर्टस


बॅचलर ऑफ आर्टस इन म्युझिक, डान्स अ‍ॅण्ड थिएटर हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. कालावधी- तीन वर्ष. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. प्रवेशाकरता विद्यार्थ्यांना चाळणी परीक्षा द्यावी लागते.
मास्टर ऑफ आर्टस इन म्युझिक डान्स अ‍ॅण्ड थिएटर. कालावधी- तीन वर्षे. प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. संपर्क- ललित कला केंद्र (गुरूकुल), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, स्कूल ऑफ परफॉर्मिग आर्टस, पुणे- ४११००७.

भारती विद्यापीठ, स्कूल ऑफ परफॉर्मिग आर्टस


संस्थेने बॅचलर ऑफ आर्टस् इन म्युझिक हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- तीन वर्ष. यामध्ये कंठसंगीत आणि वाद्यसंगीत आणि संगीताचे प्रशिक्षण दिले जाते. कंठ संगितात खयाल किंवा ध्रुपद यांत स्पेशलायझेशन करता येते. वाद्य संगितामध्ये हार्मोनियम, सतार, बासरी, संतूर, सरोद, शहनाई, सुंदरी, सारंगी यापैकी कोणतेही एक वाद्य स्पेशलायझेशनसाठी निवडता येते. परक्युशन संगीतामध्ये तबला आणि पखवाज या दोन वाद्यांची स्पेशलायझेशनसाठी निवड केली जाते. संपर्क- स्कूल ऑफ परफॉर्मिग आर्टस, भारती विद्यापीठ, युनिव्हर्सिटी एज्युकेशन कॉम्प्लेक्स, पुणे रोड, पुणे. संकेतस्थळ- spa.bharatividyapeeth.edu

ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ, संगीत विभाग


बॅचलर ऑफ आर्टस इन म्युझिक : कालावधी- तीन वर्ष. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. निवडीसाठी या उमेदवाराला ऑडिशन चाळणी उत्तीर्ण व्हावी लागते.

एम.ए, इन म्युझिक


कालावधी- दोन वर्षे अर्हता- संगीत विषयातील पदवी किंवा कोणत्याही विषयातील पदवी आणि संगीतविशारद परीक्षा अथवा या परीक्षेशी समकक्ष परीक्षा उत्तीर्ण. संपर्क- १. ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ, नाथीबाई ठाकरसी रोड, मुंबई- ४०००२०. २. ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ, जुहू रोड, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई- ४०००४०. ३. ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ, कर्वे रोड, पुणे- ४११०३८.

नॅशनल सेंटर फॉर परफोर्मिंग आर्टस (एनसीपीए)


एनसीपीए स्पेशल म्युझिक प्रोग्रॅम, गुरू-शिष्य इंडियन म्युझिक, कलाशाळा म्युझिक फॉर किड्स, संपर्क- नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्टस, एनसीपीए मार्ग, मुंबई- ४४००२१. संकेतस्थळ- www.ncpamumbai.com

मुंबई विद्यापीठ, संगीत विभाग



  1. प्री डिप्लोमा कोर्स इन हिंदुस्थानी क्लासिकल व्होकल म्युझिक : कालावधी- एक वर्ष. अर्हता- दहावी उत्तीर्ण.
  2. डिप्लोमा कोर्स इन हिंदुस्थानी क्लासिकल व्होकल/ लाइट व्होकल/ सतार/ तबला : कालावधी- दोन वर्षे. अर्हता- दहावी उत्तीर्ण.
  3. बॅचलर ऑफ म्युझिक इन हिंदुस्थानी क्लासिकल व्होकल/ सतार/तबला : कालावधी तीन वर्षे. अर्हता- बारावी उत्तीर्ण आणि मध्यमा पूर्ण.
  4. मास्टर ऑफ म्युझिक कोर्स इन हिंदुस्थानी क्लासिकल व्होकल : कालावधी दोन वर्षे. अर्हता- पदवी उत्तीर्ण आणि विशारद. पीएच.डी प्रोग्रॅम इन म्युझिक.
  5. सर्टिफिकेट कोर्स इन साऊंड इंजिनीअिरग अ‍ॅण्ड रिप्रॉडक्शन कोर्स : कालावधी सहा महिने. अर्हता- बारावी उत्तीर्ण
  6. .सर्टिफिकेट कोर्स इन म्युझिक कंपोझिशन अ‍ॅण्ड डायरेक्शन : कालावधी चार महिने. अर्हता- बारावी उत्तीर्ण.

या अभ्यासक्रमांच्या निवडीसाठी ऑडिशन टेस्ट जून महिन्यात घेतली जाते. जूनच्या अंतिम आठवड्यात निवड यादी जाहीर केली जाते. संपर्क- संगीत विभाग, मुंबई विद्यापीठ, विद्यापीठ विद्यार्थी भवन, बी रोड, चर्चगेट, मुंबई- ४०००२०.

अ‍ॅमिटी स्कूल ऑफ परफॉर्मिग आर्टस


बॅचलर ऑफ म्युझिक- क्लासिकल डान्स, बॅचलर ऑफ म्युझिक- क्लासिकल हिंदुस्थानी व्होकल, बॅचलर ऑफ म्युझिक- हिंदुस्थानी क्लासिकल इन्स्ट्रमेन्टल. या सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी - प्रत्येकी तीन वर्षे. डिप्लोमा इन क्लासिकल इन्स्ट्रमेन्टल- सतार / तबला/ सरोद/ व्हायोलीन. डिप्लोमा इन हिंदुस्थानी क्लासिकल व्होकल म्युझिक. या सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी- प्रत्येकी दोन वर्ष. सर्टिफिकेट कोर्स इन क्लासिकल इन्स्ट्रमेन्टल- सतार/ तबला/ सरोद/ व्हायोलीन, सर्टिफिकेट कोर्स इन हिंदुस्थानी क्लासिकल व्होकल म्युझिक, सर्टिफिकेट कोर्स इन क्लासिकल डान्स- भरतनाट्यम/ कथ्थक/ कुचिपुडी. या सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी- प्रत्येकी एक वर्ष. संपर्क- अ‍ॅमिटी युनिव्हर्सटी कॅम्पस, सेक्टर- १२५, एक्स्प्रेस हायवे, नॉयडा- २०१३०३. संकेतस्थळ- www.amity.edu

मित्रहो संगीत क्षेत्रात यशासाठी आवश्यक आहे ती कठोर परिश्रमाची. नियमित सराव आणि सातत्य असल्यास यश दूर नाही. पूर्ण समर्पणाची तयारी असल्यास आपण या क्षेत्रात खऱ्या अर्थाने लौकिक मिळवू शकता. गरज आहे स्वत:ला ओळखण्याची आणि त्या पदपथावर मार्गक्रमण करण्याची. आपल्यात असेल जादुई आवाज, मेहनतीची तयारी तर करिअरचा हा मार्ग नवी अनुभूती देणारा ठरेल.

लेखक - सचिन पाटील

स्रोत : vikaspedia

Comments

Popular posts from this blog

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

परीक्षेची अवास्तव भीती (एक्झाम फोबिया)

स्त्रियांची एनर्जी