परीक्षेची अवास्तव भीती (एक्झाम फोबिया)
खरंतर परीक्षेची भीती कमी-जास्त प्रमाणात आपल्यातल्या प्रत्येकालाच वाटते. काहीजण या भीतीपोटी जास्त अभ्यास करतात, तर काही जणांची ही भीती इतकी अवास्तव बनते की, परीक्षेच्या आधीपासूनच त्यांना धडधडायला लागते. पोट बिघडते, झोप उडते, अभ्यासात लक्ष लागत नाही आणि प्रत्यक्ष परीक्षा देताना हातात प्रश्नपत्रिका आली, की एकदम बधिर व्हायला होते. एकही प्रश्न ओळखीचा वाटत नाही, बघता बघता प्रश्नपत्रिकेवरची अक्षरे ‘गायब’ होऊ लागतात! मुले एकदम ‘ब्लँक’ होतात. यालाच एक्झाम फोबिया (exam phobia) किंवा ‘परीक्षेची अवास्तव भीती’ म्हणतात. परीक्षेच्या भीतीची मेंदूतील केंद्रे : मेंदूतील चार मुख्य केंद्रांमधून हे कार्य घडते. हायपोथॅलॅमस : मेंदूच्या मध्यभागातील हे केंद्र भावना समजून त्यांच्या योग्य त्या संवेदना मेंदूला आणि त्याचवेळेस अंतःस्राव निर्माण करणाऱ्या ग्रंथींना पोचवते! ॲमिग्डेला : हेही मेंदूच्या मध्यभागातील केंद्र भावनिक मेंदू व तार्किक मेंदूच्या मधल्या सेतूचे काम करते. पण हे केंद्र जास्त उत्तेजित झाले, तर तार्किक विचारशक्ती बंद पडते. हिप्पोकॅम्पस : पहिल्या दोन्ही केंद्रांच्या अगदी जव...