मराठी भाषा : व्यवसाय संधी आणि आव्हाने
अलीकडील काळात भाषिक अस्मिता हा त्या त्या भाषिक समाजाचा जिव्हाळ्याचा विषय ठरू पाहात आहे. आणि त्यात अजिबात काही गैर नाही. भाषा म्हणजे एक संस्कृतीच असते. कोणतीही भाषा नष्ट होते तेव्हा संपूर्ण समाज त्या विशिष्ट भाषेपासून दुरावत असतो. या दृष्टिकोनातून भाषिक अवशेष टिकवून ठेवणे ही त्या त्या भाषिक समूहाची जबाबदारी ठरते. मराठी भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे असे म्हणून गळा काढणारे काही कमी नाहीत. अशा गळेकाढू लोकांकडून प्रत्यक्षात मात्र भाषासंवर्धनाचे कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करून किंवा मराठी भाषा दिन साजरा करून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार खरंच शक्य आहे का हा मोठाच प्रश्न आहे. त्यातून भाषावृद्धीसाठी प्रयत्न केल्याचे फसवे समाधान मिळू शकेल मात्र वास्तव बदलणार नाही. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. डॉ. रमेश धोंगडे या भाषासंशोधकाच्या मते, भाषेचा तथाकथित विकास हा भाषेच्या प्रसारातून आणि मुख्यत: तिच्या वापरातूनच तपासता येतो. म्हणजेच दैनंदिन व्यवहारात ती भाषा किती प्रमाणात वापरली जाते यावरूनच...